औरंगाबाद:- मुंबईतील विशाल महामोर्चा नंतर मनसेने पक्षाचा विस्तार औरंगाबादेतून करण्याचे निश्चित केले आहे. उद्या सायंकाळी ५ वाजता राज ठाकरे यांचे शहरात आगमन होणार असून दोन दिवस ठाकरे शहरात राहणार असल्याची माहिती मनसे चे उपाध्यक्ष अभिजीत पानसे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी मनसेचे नेते प्रकाश महाजन, राजू पाटील, सुमित खांबेकर, जावेद शेख, सतनाम सिंग गुलाटी आदींची उपस्थिती होती.
पक्षाचा विस्तार करण्यासाठी राज ठाकरे उद्यापासून दोन दिवस शहरात असणार आहेत. पक्ष बांधणी, मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक नेत्यांशी वैयक्तिक भेट घेणार आहेत. मनसे स्वबळावर निवडणूक लढविणार आहे.सर्वच्या सर्व ११५ जागांवर मनसेने उमेदवार देण्याची तयारी केली आहे. शिवसेनेने शहर खड्ड्यात घातले आहे. रस्ते, कचरा, पाणी या मूलभूत सुविधाही नागरिकांना मिळत नाही. मतदार निराश आहेत. निवडणुकीच्या माध्यमातून आता तो राग व्यक्त करतील.
संभाजीनगरच योग्य
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शहराला संभाजीनगर असे नाव दिले आहे. शिवसेनेने मात्र केवळ राजकारण केले. नाव काही बदलले नाही. मनसे संभाजीनगर याच नावावर ठाम आहे. मनपा निवडणूक मात्र विकासाच्या मुद्द्यावरच पक्ष लढवेल. मनसेने नाशिक शहराचा पाणी प्रश्न कायमचा मिटवला आहे. शहराचा पाणी प्रश्न मनसे सोडवेल असा दावा पाटील यांनी केला.