राष्ट्रवादीची उक्ती आणि कृती !

Foto
कोरोनावर नेम अन शिवसेनेचा गेम !
ऐंशी वर्षाचा तरुण बाहेर फिरतोय अन साठ वर्षाचा मुख्यमंत्री घरात बसलाय... या विरोधी पक्षाच्या टीकेला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उत्तर दिले असले तरी कृतीतून मात्र जनतेला योग्य तो संदेश देण्यात ते यशस्वी झाले आहेत. एकंदरीत आरोग्य मंत्र्यांच्या साथीने कोरोनावर नेम धरून शिवसेनेचा गेम करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
 राज्यातील राजकीय वर्तुळात सध्या दोनच चर्चा प्रामुख्याने आहेत. एक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सामनातील मुलाखतीची अन शरद पवार यांच्या जिल्हावार दौऱ्याची ! मातोश्रीवरून राज्याचा गाडा हाकणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी सामनातून दुसऱ्यांदा मुलाखतीला प्रारंभ केला आहे. या मुलाखतीच्या पहिल्याच भागात त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घेरले. पोट दुखी हे कोरोनाचे लक्षण असू शकते, असा सनसनाटी टोला त्यांनी लगावला. या आरोप-प्रत्यारोपांची खमंग चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. एकंदरीत शिवसेनेच्या निशाण्यावर अजूनही भाजपच असल्याचे स्पष्ट होते. दुसरीकडे सेना-भाजपच्या या युद्धात राष्ट्रवादीने मात्र सेफ गेम खेळत जनतेच्या प्रश्नावर लक्ष केंद्रित केले आहे. मुख्यमंत्र्यांनी मुंबईतच राहून सर्व जिल्ह्यांचा आढावा घेत कर्णधाराची भूमिका बजावावी, असा मोलाचा सल्ला सरकारचे सूत्रधार शरद पवार यांनी दिला. बरहुकूम मुख्यमंत्र्यांनीही मुंबईत तळ ठोकून जिल्हावार आढावा घेणे सुरू केले आहे. मुख्यमंत्र्यांना मुंबईत बंदिस्त करून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मात्र प्रत्येक जिल्ह्यात दौरा करीत आहेत. महा विकास आघाडीतील प्रत्येक जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच आरोग्य मंत्री जिल्हावार बैठका घेत असताना शरद पवारांना फिरण्याची गरज काय ? असा साधा प्रश्नही शिवसेनेला पडू नये, याचे आश्चर्य वाटते. राष्ट्रवादीने सफाईदारपणे मुख्यमंत्री कॅप्टन आहेत आणि ते जिल्हावार आढावा घेत असतात असे स्पष्ट केले. तरी कृती मात्र सर्व काही सांगून जाते. जनतेत जाऊन सहानुभूती मिळवण्याची संधी या निमित्ताने राष्ट्रवादीने साधली यात शंका नाही.
साताऱ्याचा तो पाऊस !
विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या दोन टप्प्यात एक हाती सत्ता स्थापन करण्याकडे भाजपची वाटचाल सुरू असताना शरद पवारांची साताऱ्यात सभा झाली होती. भर पावसातील या सभेने निवडणुकीची सारी समीकरणे बदलली, हा इतिहास ताजा आहे. आताही कोरोनाच्या पावसात ऐंशी वर्षाचा तरूण राज्यभर फिरतोय, याचा राजकीय लाभ राष्ट्रवादीला होणार यात शंका नाही.
 मंदिर प्रश्नावर सावध !
 दरम्यान राम मंदिरांचा प्रश्न कोरोनाशी जोडून पवारांनी पवार टीकेचे धनी ठरले होते. राम मंदिर प्रश्नी महाविकासआघाडी तर उघड मतभेद आहेत. त्याच बरोबर राजकीय खळबळ उडवणाऱ्या या टीकेचा लाभ भाजपला होईल, असे लक्षात आल्याने पवारांनी मौन बाळगणेच पसंत केले. यापुढे कोणतेही राजकीय वक्ते व करायचे नाही असे जणू त्यांनी ठरवून टाकले आहे. त्यामुळेच कालच्या पत्रकार परिषदेत एकाही राजकीय प्रश्नाला पवारांनी उत्तर दिले नाही. बकरी ईद सणाबाबतही सर्वधर्मीय यांनी आपापले सण घरातच साजरे करावेत, असे आवाहन करून त्यांनी अधिक बोलणे टाळले.