खायला भाकर नाही वं माय, मोबाईल कुठून आणू?

Foto
स्मार्ट फोन नसणार्‍या विद्यार्थ्यांच्या ‘ऑनलाईन शिक्षणाचे’ तीनतेरा
कोरोनाच्या संकटानंतर एका बाजूला शहरातील शाळांसंबंधी ऑनलाइन शिक्षण, शुल्कवाढ, परीक्षा घ्यावी की नको अशा विषयांवर चर्चा सुरू असतांना साधारण परिस्थिती , हातावर पोट असलेल्यांची मुले शिक्षणापासून आणखी दूर फेकली गेली. शाळेत जाऊन शिक्षण घेण्याची मानसिकताच नसलेला हा वर्ग नव्याने सुरु झालेल्या ऑनलाइन शिक्षणाच्या चर्चेमुळे पुरता गांगरून गेला. खायला भाकरी नाही, तर मोबाईल कोठून आणायचा, असा सवाल त्यांच्याकडून उपस्थित केला जात आहे. ’ पढेगा इंडिया तभी तो बढेगा इंडिया ’ असे म्हटले जाते. मात्र या परिस्थितीत गरीब घरातील मुले शिकणार तरी कशी?
गेले 6 महिने कोरोना मुळे शाळा बंद आहेत. 2-3 महिन्यात परिस्थिती सुधारेल आणि पुन्हा एकदा शाळा सुरु होतील ही आशा कोरोनाच्या वाढत्या आकड्यामुळे केव्हाच मावळली.आधीच शिक्षणाबद्दल नकारात्मक असलेले गरीब पालक अधिकच हतबल झाल्याचे दिसून येत आहे. पुस्तके दिली खरी पण शाळा केव्हा सुरू होणार, हे शिक्षकही सांगू शकत नाहीत.भाजीविक्री करणार्‍यांची मुले त्यांना भाजी विकण्यात मदत करत आहेत. घरकाम करणार्‍या महिला देखील मुलींना कामावर सोबत नेत आहेत. याशिवाय अनेक मुले गल्ल्या गल्ल्यांमध्ये गोट्यांचा डाव खेळतांना, कधी अशीच उंडरतांना दिसतील.आधीच बेताची परिस्थिती त्यात कोरोना मुळे आर्थिक ओढाताण सुरु झाली.ऑनलाईन शिक्षणासाठी आवश्यक असणारा ’स्मार्ट फोन’ यांच्या सारख्यांनी कधी हातातही घेतला नसतांना अशाप्रकारे शिक्षण त्यांच्यासाठी कोसो दूर आहे.
हातावर पोट असणार्‍यांकडे ‘स्मार्ट फोन’ नाहीच
ज्यांच्याकडे स्मार्ट फोन नाही, अशी मुले आपल्या जवळ राहणार्‍या मोबाईलची सुविधा असणार्‍या मित्रांच्या घरी जाऊन अभ्यास करतात अथवा आज काय शिकवले याबाबत माहिती घेऊन स्वत: पुस्तकांच्या साहाय्याने अभ्यास करतात. मोलमजुरी करणार्‍यांची  मुले खूप मोठ्या शाळेत नाहीत.त्यामुळे एवढे महत्व देऊन ऑनलाईन अभ्यास ही संकल्पना राबवली जात नाही.ज्या शाळेत ऑनलाईन अभ्यास दिल्या जातो तेथील काही गरीब विद्यार्थ्यांकडे अँड्रॉइड सिस्टम असलेले मोबाइल नसल्याने परिस्थितीमुळे ते ऑनलाईन अभ्यास करणे त्यांना अशक्यच आहे.त्यामुळे हे वर्ष वाया जाणार अशीच भावना त्यांच्या मनात आहे.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker