लढवय्या प्रदेशाला दुष्काळमुक्‍त करण्यासाठी आता औरंगाबाद विकास प्राधिकरण!

Foto
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सूतोवाच
जुलमी रझाकारांशी दोन हात करून मुक्‍त झालेला मराठवाडा दुष्काळाच्या खाईत लोटला गेला आहे. ही संतांची, शूर वीरांची भूमी विकासापासून दूर राहणार नाही याची काळजी घेण्यासाठी आता औरंगाबाद विकास प्राधिकरण स्थापन करता येईल का, याचा गांभीर्याने विचार करू अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बोलत होते.
आज सकाळी 9 वाजेच्या सुमारास सिद्धार्थ उद्यानात मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा ध्वजारोहण सोहळा पार पडला. पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते ध्वजस्तंभाला पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. बंदुकीच्या फैरी झाडत स्वातंत्र्य सैनिकांना सलामी देण्यात आली. रोहयोमंत्री संदिपान भुमरे, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या हस्ते स्मृती स्तंभाला पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. यावेळी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, विधानसभा माजी विधानसभा अध्यक्ष आमदार हरिभाऊ बागडे, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, संपर्क नेते विनोद घोसाळकर, आ. प्रदीप जैस्वाल, आ. संजय शिरसाट, आ. अतुल सावे, आ. अंबादास दानवे, मनपा आयुक्‍त आस्तिक कुमार पांडेय, पोलीस आयक्‍त निखील गुप्ता, पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, माजी महापौर नंदकुमार घोडेले त्यांच्यासह ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, देश स्वतंत्र झाला तरी तब्बल तेरा महिने मराठवाडा प्रदेश निजामांच्या तावडीत होता. त्यावेळी प्रचंड जुलूम वेदना या बांधवांनी सहन केल्या. थोर स्वातंत्र्यसेनानी यांच्या नेतृत्वाखाली लहान-थोर महिला सर्वांनी लहानपणाचा लढा दिला. रझाकाराची जुलमी राजवट उखडून फेकली.
 या शूरविरांच्या मातीला आता विकासाची साथ हवी आहे. मराठवाड्यातील योजना तातडीने पूर्ण करून हा भाग दुष्काळ मुक्त कसा करता येईल याची जबाबदारी सरकारने घेतली आहे. पर्यटन विकास असो की समृद्धी महामार्ग या योजना वेगाने पूर्ण करण्याकडे सरकार लक्ष देते आहे. मुंबई -नागपूर या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महामार्गाने संपूर्ण परिसर वेगाने विकसित होणार आहे. या लढवय्या भागाला विकासासाठी अडवले जाणार नाही. औरंगाबाद शहर तर शिवसेनाप्रमुखांचे लाडके शहर आहे. आता सरकार असताना शहराचा विकास करायचा नाही तर केव्हा? असे सांगून ठाकरे म्हणाले की मराठवाडा विकास प्राधिकरण तर आहेच पण त्याच जोडीला औरंगाबाद विकास प्राधिकरण होऊ शकते का? याचा विचार पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या सोबतीने मंत्रिमंडळ करेल.

मोकळा श्वास आणि मास्क!
कोरोना परिस्थितीचे गांभीर्य सांगताना मुख्यमंत्री म्हणाले, मराठवाड्याने आजच्या दिवशी स्वातंत्र्याचा मुक्त श्वास घेतला होता. मात्र दुर्दैवाने आज मास्क लावून फिरण्याची वेळ आली आहे. सबंध जगावरच असे संकट आहे. मात्र धैर्याने सामना करून आता कोरोनाबरोबरचे युद्धही लढायचे आहे. मी आपल्या सोबत नाही याचे दुःख मला जरूर आहे, मात्र मी मनाने तुमच्यासोबत आहे. राज्यात माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम सुरू केली आहे. आपण सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित त्यामुळे प्रत्येकाने नियमांचे पालन करावे असे ते म्हणाले.
कार्डियाक अ‍ॅम्बुलन्सचे लोकार्पण!
कोरोना रुग्णांसाठी अत्याधुनिक सेवा सुविधा असलेली कार्डियाक अ‍ॅम्बुलन्सचा लोकार्पण सोहळा पालक मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते पार पडला. मनपा आयुक्त अस्तिक कुमार पांडेय, पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेल्या या अ‍ॅम्ब्युलन्समध्ये गंभीर रुग्णांना तातडीचे उपचार देण्याची सोय आहे. विशेष म्हणजे या अ‍ॅम्बुलन्स मध्ये ऑक्सिजन सह इतर अत्याधुनिक उपचार सुविधा असल्यामुळे गंभीर रुग्णांचे जीव वाचू शकतात, असा दावा मनपा अधिकार्‍यांनी केला.
मुख्यमंत्र्यांविरोधात युवकांची घोषणाबाजी!
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मराठवाडा मुक्‍तीसंग्राम दिनाच्या कार्यक्रमाला अनूपस्थित राहिल्याबद्दल नाराजी व्यक्त करीत काही युवकांनी सिद्धार्थ उद्याना समोरील रस्त्यावर घोषणाबाजी केली. असंख्य स्वातंत्र्य सैनिकांनी बलिदान देऊन हा प्रदेश रझाकाराच्या तावडीतून मुक्‍त केला आहे. त्या हुतात्म्यांचा अपमान मुख्यमंत्र्यांनी केल्याचा आरोप मराठवाडा विकास मंचचे गोविंद देशपांडे, गजानन वागळे, दत्तात्रय जांभुळकर, सादर शिंदे यांनी केला. सिद्धार्थ उद्यानासमोरील दुभाजकावर चढून या युवकांनी जोरदार घोषणाबाजी केली. 
जिल्ह्याचे खासदार इम्तियाज जलील या कार्यक्रमाला उपस्थित न राहिल्याबद्दलही संताप व्यक्त करीत जलील यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. दहा ते पंधरा मिनिटे या युवकांची घोषणाबाजी सुरू होती. पोलिसांनी वेळी त्यांना अटकाव घातला.
आरक्षण प्रश्नी मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी सुभाष देसाई यांना निवेदन सादर केले. शासनाने मराठा समाजाला तातडीने आरक्षण द्यावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. कार्यक्रम स्थळी मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते दाखल झाल्याने पोलिसांची एकच धावपळ उडाली. वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी धाव घेत कोणतीही अनुचित घटना घडणार नाही, याची दक्षता घेतली. कार्यकर्त्यांची समजूत घालत तुमची निवेदन पालकमत्र्यांपर्यंत पोहोचेल असा विश्वास देत पोलिस अधिकार्‍यांनी त्यांना रोखून धरले. त्यानंतर पालकमंत्री अभ्यागत यांच्या भेटीसाठी आल्यानंतर त्यांनी मराठा क्रांती मोर्चाचे निवेदन स्वीकारले.