वा रे नेते...

Foto


 

 बैठकीला जाताना डरकाळी...
बाहेर आल्यावर म्याऊ म्याऊ !!

 काल सुभेदारीवर तीन तास गंभीर चिंतन करून शहरातील लोकप्रतिनिधींनी प्रशासनाविरोधात डरकाळी फोडली. आम्ही तीन महिने गप्प राहिलो असे सांगतरणांगणात उतरण्याचे सूतोवाच केले. शहराच्या स्थितीला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर निशाणा साधला. त्यामुळे आज विभागीय आयुक्तांसोबतच्या बैठकीत काय महाभारत घडणार ? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. मात्र झाले ते उलटेच ! बैठकीला जाण्यापूर्वी डरकाळी फोडणारे लोकप्रतिनिधी बाहेर आल्यानंतर म्याऊ म्याऊ करताना दिसले. अन शहरवासीयांची घोर निराशा झाली.
 तब्बल तीन महिन्यानंतर जागे झालेल्या शहरातील लोकप्रतिनिधींनी काल सुभेदारीवर तीन तास खलबते केली. खासदार डॉक्टर भागवत कराड, खासदार इम्तियाज जलील, आमदार प्रदीप जैस्वाल, आमदार अतुल सावे, आमदार सतीश चव्हाण, आमदार संजय शिरसाट, आमदार अंबादास दानवे या सर्वपक्षीय लोकप्रतिनिधीनी चिंता व्यक्त करीत आता मैदानात उतरणार असा पवित्रा जाहीर केला. गेले तीन महिने आम्ही प्रशासनाच्या कामात ढवळाढवळ केली नाही.  त्याचा परिणाम शहर संसर्गाच्या खाईत लोटण्यात  झाला असा दावा या मंडळींनी केला होता. जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, आरोग्य यंत्रणा यांच्यावर निशाणा साधत सर्व यंत्रणा अपयशी ठरल्याचा ठपकाही या मंडळींनी ठेवला. आज विभागीय आयुक्तांसोबत बैठक घेत आमचे म्हणणे मांडू असे स्पष्ट केले. लोकप्रतिनिधींचा पवित्रा बघता आता मोठे महाभारत घडणार अशी शंका येत होती. आता नेत्यांनीच शहराची ची दोरी हातात घेतल्याचा आनंद शहरवासियांनाही झाला. या बैठकीत काहीतरी मोठा निर्णय होईल अशी अपेक्षा होती. मात्र झाले ते उलटेच. दर आठवड्याला आढावा बैठक घेऊ, रुग्णांचे स्वब  वेळेवर घ्यावेत, क्वारान्टीन सेंटरमध्ये सोयीसुविधा पुरवाव्यात, शहरातील हॉटेल्सलाही क्वारान्टीन सेंटर बनवावेत, खाजगी हॉस्पिटल मध्ये शासकीय अधिकारी नेमावा, यासह शहरातील पी१ पी २ चा नियम मोडीत काढून सर्व दुकाने एकाच वेळेत खुली करावी आदी निर्णय झाल्याची माहिती खासदार कराड, खासदार जलील यांनी दिली. आमचा कोणत्याही अधिकाऱ्यावर रोष नाही, कोणत्याही अधिकाऱ्याला हटवण्याची मागणी आम्ही केली नाही असे सांगण्यास नेते विसरले नाही.
 संसर्ग वाढवणारा निर्णय !
दरम्यान शहरात संसर्ग वाढत असताना खरेतर संचारबंदी अधिक कठोर करून व्यवसायांच्या वेळा मर्यादित करायला हव्या होत्या. मात्र लोकप्रतिनिधींनी सर्व दुकाने उघडण्याची मागणी करून आश्चर्याचा धक्काच दिला. प्रशासकीय यंत्रणेने मुळेच संसर्ग वाढल्याचा दावा करणाऱ्या लोकप्रतिनिधींनी नव्या कोणत्याही उपाययोजना आयुक्तांना सुचविल्या नाहीत.  काल अधिकाऱ्यांवर अपयशाचा ठपका ठेवणाऱ्या नेत्यांनी आज ब्र शब्दही उच्चारला नाही त्यामुळे काल गुर गुरणारे हे नेते आज एवढे मवाळ कसे ? असा प्रश्न  विचारला जात आहे.