३७४ वाहनांवर कारवाई...
संचारबंदी मोडून बाहेर पडणाऱ्यांवर आज पोलिसांनी कठोर कारवाई केली. वाहतूक पोलिसांनी दिवसभरात ३७४ वाहन धारकांकडून १ लाख १५ हजारांचा दंड वसूल केला.
शहरात नऊ दिवसांची पूर्णपणे टाळेबंदी लागू असल्यानंतरही काही टवाळखोर वाहनधारक मात्र शुक्रवारी घराबाहेर पडल्याचे निदर्शनास आले. घराबाहेर पडण्यामागचे कुठलेही संयुक्तिक कारण देता न आलेल्या ३७४ टवाळखोर वाहनधारकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई करून त्यांच्याकडून एक लाख पंधरा हजार ८०० रूपयांचा दंड वसूल केला. तर दुसरीकडे सुजाण नागरिकांनी बंदला उत्सफुर्त प्रतिसाद दिला. शहरातील विविध भागात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे निदर्शनास आल्यावर हादरलेल्या प्रशासनाने १० ते १८ जुलैपर्यंत टाळेबंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. शुक्रवारपासून टाळेबंदीला सुरूवात झाल्यावर सकाळपासूनच शहरातील विविध भागांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळाला. कांचनवाडी, नक्षत्रवाडी, पैठण रोड, बीड बायपास, शहानूरमिया दर्गा, मुख्य बाजारपेठ असलेल्या गुलमंडीसह जाधववाडी, टिव्ही सेंटर, पैठणगेट तसेच इतर सर्व भागांतील नागरिकांनी बंदला उत्सफुर्त प्रतिसाद दिला. मात्र, काही टवाळखोरांनी बंदच्या आदेशाचे उल्लंघन केले. शहर पोलिसांनी सायंकाळी सहा वाजेपर्यंत टवाळखोरांविरुध्द २४ गुन्हे दाखल केले. तसेच वाहतूक शाखेच्या शहर विभागाने ५७, सिडको विभागाने ४२, छावणी विभागाने १५ आणि वाळूज विभागाने ३८ अशा १५२ जणांची वाहने ताब्यात घेतली. तसेच वाहन कायद्यानुसार ३७४ जणांना पकडून पोलिसांनी एक लाख पंधरा हजार ८०० रूपयांचा दंड वसूल केला.











