गेल्या आठवडाभरापासून विश्रांती घेतलेल्या पावसाने काल जोरदार पुनरागमन केले. जिल्ह्यातील चार मंडळात अतिवृष्टीची झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. सर्वाधिक ११७ मिमी पाऊस चितेपिंपळगाव मंडळात पडला.
जून महिन्यात झालेल्या चांगल्या पर्जन्यवृष्टीमुळे जिल्हा सुखावला होता. आता जुलै महिन्यातही वरुणराजाने कृपा केली आहे. काल संध्याकाळी जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाला. सोयगाव तालुक्यात सर्वाधिक ४९ मिलिमीटर पाऊस झाला. त्याखालोखाल फुलंब्री तालुक्यात ४३ तर औरंगाबाद तालुक्यात ३९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. सिल्लोड १८.२ मिमी, वैजापूर ८.६, गंगापूर ७.४, कन्नड ७.६, खुलताबाद ५.४ तर पैठण तालुक्यात ४.९ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद जिल्हा प्रशासनाने घेतली आहे.
चार मंडळात अतिवृष्टी !
दरम्यान जिल्ह्यातील चार मंडळात अतिवृष्टीची नोंद घेण्यात आली. चितेपिंपळगाव मंडळात ११७ मिमी पाऊस पडला आहे. त्याखालोखाल सोयगाव मंडळात ८३ मिमी, वडोद बाजार ७८ तर करमाड मंडळात ७४ मिमी पाऊस पडला आहे.











