औरंगाबाद शहरातील नागरिक तसेच वाहनचालकांना सुविधा व्हावी यादृष्टीने शहरात ठिकठिकाणी महानगरपालिकेच्या वतीने उड्डाणपूल तयार करण्यात आले. हे उड्डाणपूल जसे सुविधा म्हणून उपयोगी पडतात तसेच त्यांच्याकडे शहरातील सौंदर्यस्थळे म्हणून देखील बघितले जाते. परंतु काही उड्डाणपूल अस्वच्छता, कचरा,बेघरांचे घर या दृष्टीने शहराची निराळीच शोभा वाढवत आहेत.विविध सामाजिक संघटनांकडून या उड्डाणपूलांना रंगरंगोटी करत सुशोभीकरण करण्यात येते. मात्र यामुळे उर्वरित अस्वच्छ उड्डाणपूल ठळक उठून दिसत आहेत.
शहरात बाबा पेट्रोल पंप, मोंढा नाका, सेव्हन हिल, सिडको याठिकाणी उड्डाणपूल बांधण्यात आले आहेत. मात्र त्यांच्या स्वच्छता, देखभालीकडे दुर्लक्ष झाल्यामुळे आजघडीला पूलांची अवस्था बिकट झाली आहे.जवळपास राहणार्या नागरिकांकडून उड्डाणपूलांखाली कचरा फेकला जातो, पादचार्यांकडून लघुशंकेसाठी वापर यामुळे मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली आहे.याच पुलाच्या दुसर्या बाजूस मात्र सामाजिक संघटनेद्वारे संरक्षक जाळी, बसण्यासाठी बाकडे, खांबावर सामाजिक संदेश, चित्रे रंगवण्यात आली आहेत.याप्रमाणेच सेव्हन हिल पुलाखाली औरंगाबाद सायकलिंग असोसिएशन तर्फे नुकतेच सुशोभीकरण करण्यात आले.मात्र याला खेटूनच असलेला उर्वरित भाग अतिशय दयनीय अवस्थेत आहे. दोन्हींमधील फरक उठून दिसतो.जायंट्स ग्रुप ऑफ औरंगाबाद प्राईडच्या पुढाकाराने एपीआय कॉर्नर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपूलाखाली शहराची स्वच्छता व सौंदर्यीकरणाच्या उद्देशाने जायंटस फ्लाय पार्क तयार करण्यात आला आहे. उजाड, दुर्गंधीयुक्त, रखरखीत अशा भागात आज नंदनवन फुलले आहे. मात्र याच्याच अर्ध्या भागात बाजूला आजही कचरा, दुर्गंधीची समस्या कायम आहे.















