महायुतीतील दोन्ही आमदार पुन्हा आमने - सामने
महायुतीत एकी ही कागदावरच, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक , आरक्षण
सोडतीनंतर गटबाजी, इच्छुकांची मात्र धावपळ सुरू
अलिम चाऊस
तालुक्यातील नगर परिषद, पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, आता केवळ अधिकृत तारखांच्या घोषणेची प्रतीक्षा आहे. आरक्षण सोडतीनंतर राजकीय समीकरणे बदलली आहे. महायुतीतील गटबाजी पुन्हा उफाळून आली आहे. तालुक्यातील दोन्ही आमदार भाजपचे प्रशांत बंब आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे रमेश बोरणारे यांच्यातील थंड युद्ध पुन्हा तापू लागले आहे.
महायुतीतील एकी ही केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र ;
भाजप, शिंदे गटाची शिवसेना आणि अजित पवार गटाची राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांची महायुती अस्तित्वात असली तरी, गंगापूर तालुक्यात प्रत्यक्षात ही तिकडी एकत्र दिसत नाही. आमदार प्रशांत बंब आणि आमदार रमेश बोरणारे यांच्या नेतृत्वाखालील गटांनी आपापल्या कार्यकर्त्यांवर मजबूत पकड ठेवली आहे. त्यामुळे महायुतीतील ङ्गङ्ग्रएकीफ्फ ही केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र आहे.
शिंदे गट व राष्ट्रवादीतील दुरावा कायम :
गंगापूर तालुक्यातील शिंदे गटाचे माजी आमदार कैलास पाटील, अण्णासाहेब माने पाटील यांचा प्रभाव कायम असला तरी, अजित पवार गटाशी त्यांची गळाभेट होण्याची
शक्यता नाहीच. भाजप व शिंदे गटाचे काही स्थानिक नेतेही परिस्थितीनुसार आमदार प्रशांत बंब यांच्याशी समीकरणे साधताना दिसतात. त्यामुळे या वेळी महायुती पेक्षा व्यक्तीगत गट आणि स्थानिक निष्ठाफ्फअधिक प्रभावी ठरण्याची चिन्हे आहेत. आरक्षण सोडतीनंतर महिलांना मोठी संधी अलीकडेच जाहीर झालेल्या गणनिहाय आरक्षणात अनेक ठिकाणी सर्वसाधारण महिलांसाठी गण राखीव ठेवण्यात आल्याने महिला कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
सावंगी (अनु. जाती), रांजणगाव शेणपुंजी (अनु. जाती महिला), जोगेश्वरी (अनु. जाती महिला), तुर्काबाद (अनु. जमाती), शिल्लेगाव आणि कायगाव (ना. मा. प्रवर्ग), वाळूज बुद्रुक (ना. मा. प्रवर्ग महिला), गुरु धानोरा (ना. मा. प्रवर्ग महिला) तर आंबेलोहोळ, सिद्धनाथ वाडगाव, वाहेगाव, शेंदूरवाडा, लिंबे जळगाव, घोडेगाव, जामगाव, नेवरगाव आदी ठिकाणी सर्वसाधारण महिलांसाठी गण खुल्या झाल्या आहेत. यामुळे अनेक प्रस्थापित नेत्यांच्या कुटुंबातील महिला आता निवडणूक मैदानात उतरण्याची शक्यता वाढली आहे.
गंगापूरात आरक्षणाच्या या फेरबदलात आमदार प्रशांत बंब यांच्या गंगापूर तालुक्यातील सर्व ठिकाणी गटाला सर्वाधिक राजकीय बळ मिळाल्याचे जाणकारांचे मत आहे. बंब यांचे बळ केवळ पक्षापुरते मर्यादित नसून, पक्षविरहित जनाधारावर आधारलेले असल्याने त्यांचा प्रभाव गंगापूर तालुकाभर दिसून येत आहे.
पुन्हा आमने-सामने येणार दोन्ही आमदार :
नगर परिषद, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये महायुतीतील दोन्ही आमदार प्रशांत बंब , पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण पुन्हा एकदा समोरासमोर येण्याची शक्यता आहे. महायुतीत एकजूट होण्याची शक्यता अल्प असल्याने तालुक्यातील राजकीय तापमान दिवसेंदिवस वाढत आहे. राजकीय वातावरण अधिक रंगत जाण्याची शक्यता तालुक्यात काही दिवसांत राजकीय वातावरण अधिक रंगत जाण्याची शक्यता आहे. महायुतीतील अंतर्गत गटबाजी आरक्षणाचा परिणाम निवडणूक लढतींवर स्पष्टपणे दिसेल, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.