सरकारने 31 ऑगस्टपर्यंत धार्मिक स्थळे उघडली नाहीत तर 1 सप्टेंबर रोजी मंदिरे खुले करू अशी घोषणा करणार्या एमआयएमने काल खडकेश्वर मंदिराकडे धाव घेतल्याने ऐन गणेश विसर्जनाच्या दिवशीच शहराचे राजकीय वातावरण तापले. शिवसैनिकांनी खडकेश्वर मंदिराला कडे करीत एमआयएमला रोखले. तर मनसेनेही या प्रकरणात उडी घेतल्याने शहरात काल शिवसेना- एमआयएम -मनसे धुमश्चक्री पाहायला मिळाली. दरम्यान आज दुपारी 2 च्या सुमारास एमआयएम शाहगंज येथील मशीद उघडणार आहे.
ऐन गणेश विसर्जनाच्या दिवशीच एमआयएमने खडकेश्वर मंदिर उघडत पुजार्यांना निवेदन देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार दुपारी 1 वाजेपासूनच कार्यकर्ते खडकेश्वर परिसरात जमा होऊ लागले. ही माहिती मिळताच शिवसेना नेत्यांनीही मंदिराकडे धाव घेतली. खा. इम्तियाज जलील दुपारी दोन वाजता पुजार्यांना निवेदन देण्यासाठी येणार होते. त्यामुळे पोलिसांनी या परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवला. मंदिराकडे जाणारे रस्ते बॅरिकेट्सने बंद करण्यात आले. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, आ. अंबादास दानवे नगरसेवक राजू वैद्य यांच्यासह शेकडो शिवसैनिकांनी मंदिराकडे धाव घेत मंदिराला सुरक्षा कडे केले. यावेळी शिवसेना कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केल्याने वातावरण तापले होते.
पोलिस खासदारांच्या घरी !
दरम्यान, काल गणेश विसर्जन असल्याने शहरात सर्वत्र पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. त्यातच एमआयएमने आंदोलनाची भाषा केल्याने यंत्रणा सतर्क झाली. पोलिस आयुक्तांच्या आदेशानुसार पोलिसांनी खासदार जलील यांच्या घरी जात आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली. शहरात गणेश विसर्जन शांततेत साजरा होत आहे. अशा परिस्थितीत राजकीय वातावरण तापले तर पोलिसांवरील ताण वाढेल, आंदोलन स्थगित करावे अशी विनंती पोलिसांतर्फे करण्यात आली. त्यानंतर खासदार जलील यांनी आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा केली.
अफवांवर विश्वास ठेवू नये- पो.आयुक्त
खासदार इम्तियाज जलील यांनी मशीद उघडण्यासाठी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर आंदोलनाच्या काही तास अगोदर खबरदारीचा उपाय म्हणून परिसरातील फळ-भाजी विक्रेत्यांच्या हातगाड्या एका बाजूला करण्यात आल्या तर शहगंज येथील मशिदी समोर पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी आज दुपारी या भागाचा आढावा घेतला.
या वेळी प्रसार माध्यमांना सांगताना शहरवासीयांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, नागरिकांनी कोणत्याही गोष्टीची शहानिशा करण्यासाठी पोलिसांशी संपर्क करा असे आवाहन पोलीस आयुक्तांनी केल आहे.
मनसेही मैदानात !
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा प्रमुख सुहास दाशरथे यांच्यासह मनसे कार्यकर्त्यांनी खडकेश्वर मंदिराकडे धाव घेत शिवसेनेला लक्ष केले.
शिवसेनेचे मुख्यमंत्री असूनही मंदिरे उघडली जात नाही. हिंदुत्वाचा ठेका घेणारी शिवसेना आता काँग्रेस राष्ट्रवादी सोबत सरकारमध्ये आहे. शिवसेना एमआयएम मंदिर प्रश्नांवर स्टंट बाजी करीत असल्याचे दाशरथे म्हणाले.
मोबाईल वरच भिडले खैरे -जलील !
दरम्यान खडकेश्वर मंदिर परिसरात शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी तेथूनच खा. जलील यांना फोन लावला. खैरे यांनी जलील यांना एकेरी भाषा वापरत राजकारण करू नको, हिंदूंच्या भावनांशी खेळू नको, हिंमत असेल तर इथे येऊन दाखव. अशा भाषेत सुनावले. जलिल यांनीही तुम्ही हिंदुत्वाचे ठेकेदार का ? असा सवाल खैरेंना केला. सरकार तुमचे असताना मंदिरे खुली केली जात नाही, असेही ते म्हणाले. या नेत्यांच्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींनी वातावरण अधिकच तापले.