जिल्ह्यात रेकॉर्ड ब्रेक 758 मिमी पाऊस

Foto
जून-जुलै या दोन महिन्यातील 57 दिवसांच्या कालखंडात रेकॉर्ड ब्रेक पाऊस पडला आहे. जिल्ह्याची वार्षिक सरासरी 549.7 मिली एवढी असताना आत्तापर्यंत तब्बल 758 मिमी पाऊस झाल्याचा दावा भारतीय हवामान खात्याचे शास्त्रज्ञ राजेश कुमार सिंह यांनी केला आहे. गेल्या दहा वर्षात पहिल्या दोन महिन्यात एवढा मोठा पाऊस झाला नव्हता हे विशेष !
 सन 2012 नंतर मराठवाड्याला तीव्र दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागल्या. 2013 आणि 2015 या वर्षात तर विभागातील आठही जिल्हे दुष्काळाने अक्षरश: होरपळून निघाले. त्यानंतर दुष्काळाचा सिसेमिरा संपला नव्हता. विशेषतः जून महिन्यातच पाऊस दडी मारत असे. त्यामुळे शेतकर्‍यांवर दुबार पेरणीचे संकट सतत घोंगावत राहिले. गेल्या तीन वर्षांचा अभ्यास केला तर जवळपास पन्नास टक्के शेतकर्‍यांना दुबार पेरणी करावी लागली आहे. आयएमडीचे शास्त्रज्ञ राजेश कुमार सिंह यांच्या दाव्यानुसार जिल्ह्याची सरासरी 549.7 मिमी असताना जून महिन्यातच तब्बल 497 मिमी पाऊस पडला होता. पहिल्या चाळीस दिवसातच जिल्ह्याची वार्षिक सरासरी पावसाने ओलांडली. गेल्या दहा वर्षात जून महिन्यात एवढा मोठा पाऊस झालेला नव्हता. जून ते सप्टेंबर या काळात जिल्ह्यात सरासरी 549 मिमी पाऊस पडतो. आतापर्यंत जिल्ह्यात 758 मिमी पाऊस झाला आहे.