महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सप्टेंबरपासून मुद्रांक शुल्कात ३ टक्क्यांनी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गृहनिर्माण व बांधकाम क्षेत्राची आर्थिकदृष्ट्या विस्कळीत झालेली परिस्थिती सुधारण्याला चालना मिळणार असल्याचे क्रेडाईचे अध्यक्ष नरेंद्रसिंग जबिंदा यांनी सांगितले.
आधीच कोरोनाचे संकट आल्याने सर्वच क्षेत्रावर त्याचा परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीत बांधकाम क्षेत्रात देखील अर्थव्यवस्था विस्कळीत झाली आहे. त्यात गृहनिर्माण आणि बांधकाम क्षेत्राला मोठा फटका बसला होता. ही परिस्थिती लक्षात घेता मंत्रिमंडळाने बैठक घेऊन महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यात मुद्रांक शुल्कात १ सप्टेंबरपासून ते ३१ डिसेंबर या कालावधीत ३ टक्क्यांनी कमी करण्यात आला आहे. तर १ जानेवारी २०२१ ते ३१ मार्च २०२१ या कालावधीकरिता मुद्रांक शुल्क २ टक्क्यांनी घटविला आहे. या सध्याच्या मुद्रांक शुल्कात दर कमी केल्याने ग्राहकांना देखील याचा फायदा होणार आहे. त्यामुळे घरे स्वस्त होतील आणि घर खरेदी देखील वाढू शकतात. अशी शक्यता बांधकाम क्षेत्रात वर्तवली जात आहे. तसेच बांधकाम क्षेत्राला आता आर्थिक चालना मिळणार आहे. असे अध्यक्ष नरेंद्रसिंग जबिंदा यांनी स्पष्ट केले.
ग्राहकांना होईल फायदा: उपाध्यक्ष आशुतोष नावदंर
घरे खरेदी करताना ग्राहकांना तीन टक्क्यांचा फायदा होणार आहे. त्यामुळे ग्राहकांचा घरे खरेदीकडे ओढा देखील वाढेल आणि बांधकाम क्षेत्राला नक्कीच फायदा होईल. सर्वाधिक बांधकाम क्षेत्रात अनेकांना रोजगार उपलब्ध झालेले आहेत. या क्षेत्राकडे शासनाने लक्ष देण्याची गरज आहे. सध्या मुद्रांक शुल्कचा जो निर्णय घेतला आहे तो एक महत्वपूर्ण निर्णय घेतल्याने ग्राहकांना देखील घर खरेदी करताना फायदा होईल, नागरिकांकडून घरांची मागणी वाढू शकते. असे क्रेडाईचे उपाध्यक्ष आशुतोष नावदंर यांनी सांगितले.