लिहाखेडी मांडणा रस्त्याच्या दुरुस्तीसाठी एकनाथ हिवाळे यांचे निवेदन

Foto
सिल्लोड, (प्रतिनिधी) : लिहाखेडी, मांडणा मुख्य रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे या मार्गावरून ये - जा करणाऱ्या नागरिकांसह शालेय विद्यार्थी व वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच या मार्गावरून पाणी टँकर व अवजड वाहनांची वाहतूक होत असल्याने रस्त्याची अवस्था आणखी बिकट झाली आहे.

या गंभीर समस्येची दखल घेत भाजप भवन मंडळाध्यक्ष एकनाथ हिवाळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देऊन लिहाखेडीमांडणा मुख्य रस्त्याची तातडीने पाहणी करून दुरुस्तीचे काम करण्यात यावे, अशी मागणी केली.

रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून, अपघाताची शक्यताही निर्माण झाली आहे. त्यामुळे संबंधित विभागाने या निवेदनाची तातडीने दखल घेऊन रस्त्याची पाहणी करून आवश्यक दुरुस्तीचे काम लवकरात लवकर हाती घ्यावे, व नवीन आराखड्यात घेऊन काम मंजूर करून तात्काळ करण्यात यावे अशी मागणी भाजप भवन मंडळाध्यक्ष एकनाथ हिवाळे यांनी केली आहे. यावेळी अंकुश कोठाळे, निवृत्ती कोठाळे यांची उपस्थिती होती.