शहर व जिल्हा कार्यकारणी जाहीर केल्यानंतर भाजपने आता वार्ड चलो अभियान सुरू केले आहे. नेत्यांनी प्रत्येक वार्डाचा दौरा सुरू केला असून समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. दुसरीकडे शिवसेनेने मात्र एवढ्यात मनपाच्या निवडणुका नाहीत असा दावा करीत शिवसैनिक नोंदणी अभियानाला प्रारंभ केला.
कोरोना महामारी मुळे महानगरपालिकेच्या निवडणुका लांबल्या आहेत. दरम्यान बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद शहर राज्यातील इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्या जातील, अशी अटकळ बांधली जात आहे. त्यादृष्टीने विरोधी पक्षात असलेल्या भारतीय जनता पार्टीने मोर्चेबांधणी सुरू केली. तब्बल सहा महिने रखडलेल्या शहर आणि जिल्हा कार्यकारिणीची नियुक्त्या केल्यानंतर आता शहर कार्यकारिणीने महानगरपालिका निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले आहे. कालपासून भाजपने वार्ड अभियान सुरू केले असून प्रत्येक वार्डात भाजपची नेते मंडळी संपर्क अभियान राबवत आहे. वार्डाच्या समस्या आणि मतदारांशी संवाद असा कार्यक्रम भाजपने आखला आहे. सर्वच्या सर्व 115 वार्डात संपर्क करण्याची रणनीती भाजपाने आखली आहे. दुसरीकडे सत्ताधारी शिवसेना मात्र अजूनही निवडणुकीच्या मूडमध्ये परतलेली नाही. त्यामुळेच महाविकास आघाडीच्या घटक पक्षांबरोबर अजून कोणत्याही प्रकारची चर्चा सुरू झालेली नाही. जिल्हाप्रमुख आ. अंबादास दानवे यांनी तर महानगरपालिकेच्या निवडणुका एवढ्यात होणार नाही, असा दावा केला.
दुसरीकडे शिवसेनेने शिवसैनिक नोंदणी अभियानाला आजपासून प्रारंभ केला. आ. प्रदीप जैस्वाल आणि आ. संजय शिरसाठ या कट्टर शिवसैनिकांनी फॉर्म भरून देऊन अभियानाची सुरुवात केली. 30 सप्टेंबर पर्यंत चालणार्या या अभियानात प्रत्येक विधानसभा मतदारसंघात 50 हजार शिवसैनिकाची नोंदणी करण्याचे उद्दिष्ट पक्षाने ठेवले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.















