तुफान खरेदी पेट्रोल पंप ड्राय...!

Foto
उद्यापासून कडकडीत संचारबंदी लागू होणार असल्याने गेल्या दोन-तीन दिवसांपासून पेट्रोल पंपावर वाहनधारकांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. ग्राहकांनी मोठ्या प्रमाणावर पेट्रोल खरेदी केल्याने शहरातील काही पेट्रोल पंपावर आज नो स्टॉकचे बोर्ड झळकले. ग्राहकांची नेहमी वर्दळ असलेल्या दिल्ली गेट येथील पेट्रोल पंपावरही सकाळपासूनच पेट्रोल नसल्याने विक्री ठप्प झाली.
 कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी १० जुलैपासून नऊ दिवसांची संचारबंदी जारी केली आहे. या काळात दवाखाने वगळता सर्व अत्यावश्यक सेवा बंद राहणार आहेत. तर पोलीस, आरोग्य कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवेतील शासकीय कर्मचाऱ्यांनाच बाहेर पडण्याची मुभा आहे. नऊ दिवस बंद राहणार असल्याने अनेकांनी गेल्या दोन दिवसात पेट्रोल भरण्यासाठी पंपावर रांगा लावल्या होत्या. ग्राहकांनी वाहनात अधिकचे पेट्रोल भरून घेतले. त्यामुळे अनेक पंपावरील स्टॉक लवकरच आटोपला. शहरातील काही पेट्रोल पंपावर नो स्टॉक चे बोर्ड झळकल्याने ग्राहकांची मोठी तारांबळ उडाली. 

गेल्या दोन दिवसात मोठ्या प्रमाणावर पेट्रोलची विक्री झाली. ग्राहकांनी जास्त प्रमाणात पेट्रोल भरून घेतले. त्यामुळे आज स्टॉक संपला आहे. दुपारपर्यंत नवीन स्टॉक येईल आणि तातडीने ग्राहकांना पेट्रोलची विक्री करण्यात येईल, असे पेट्रोल पंप मालक प्रिंटर यांनी सांजवार्ता शी बोलताना सांगितले.