कडक लॉकडाऊन करा हो साहेब!

Foto
लाईव्ह संवादात जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी
जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्या फेसबुकवरील लाईव्ह संवादात अनेकांनी कडक लॉकडाऊन करण्याची मागणी केली. तर लॉकडाऊन मधील त्रुटींवर बोट ठेवत अनेकांनी प्रशासनाला एक प्रकारे कठोर होण्याचा सल्ला दिला.
 शहरात कोरोना संसर्गाने आता थैमान घातले आहे. तर ग्रामीण भागातही कोरोनाचा संसर्ग वाढू लागला आहे. जिल्हा अशा प्रकारे संसर्गाच्या विळख्यात अडकत असताना प्रशासन मात्र लॉक डाऊन करण्याच्या मनस्थितीत नाही. काल जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सर्वसामान्यांशी संवाद साधला. महिनाभराच्या कालावधीनंतर पुन्हा एकदा जिल्हाधिकारी सर्वसामान्यांच्या प्रश्नाला सामोरे गेले. शहराची स्थिती, प्रशासन करीत असलेले प्रयत्न, उपाय योजना त्याच बरोबर सर्वसामान्यांनी घ्यावयाची काळजी याबाबत जिल्हाधिकार्‍यांनी सविस्तर विवेचन केले. फेसबुक लाईव्हच्या पहिल्या संवादात जिल्हाधिकार्‍यांनी बहुतांश वेळ जनजागृतीवर घालवला होता. यावेळी मात्र प्रशासकीय उपाययोजनांची माहिती दिली. 
जनतेला हवे कडक लॉक डाऊन
दरम्यान, अनेकांनी जिल्हाधिकार्‍यांना थेट लॉक डाऊन का करीत नाहीत, असा थेट प्रश्न विचारला. अनेकांनी लॉक डाऊन मधील त्रुटींवर बोट ठेवत योग्य अंमलबजावणी होत नसल्याचे सांगितले. वाळूज परिसरात कडक लॉक डाऊन जाहीर होतो, तर शहरात आत्तापर्यंत कडक लॉक डाऊन का पाळण्यात आला नाही, असेही असाही सवाल जिल्हाधिकार्‍यांना विचारण्यात आला. दूध, भाजीपाला, फळे यासारख्या वस्तूंची दुकानेही बंद ठेवण्यात यावी, असाही सल्ला अनेकांनी जिल्हाधिकार्‍यांना यावेळी दिला.