जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त दिवसा तर विभागीय आयुक्त रात्रपाळीवर !
शहरात संचारबंदीची काटेकोर अंमलबजावणी होते की नाही यावर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी विभागीय आयुक्तांनी मास्टरप्लॅन बनविला आहे. त्यानुसार आता दिवसा जिल्हाधिकारी उदय चौधरी, सायंकाळी मनपा आयुक्त अस्तिक कुमार पांडे तर रात्री विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर शहरात अचानक भेटी देणार आहेत.
कोरोना संसर्गाची साखळी तोडण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे. त्यामुळे आता महसूल तसेच मनपा प्रशासनाकडून मास्टर प्लॅन तयार करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यानुसार शहरात संचार बंदीची अंमलबजावणी कशी होते यावर आता जिल्हाधिकारी उदय चौधरी, मनपा आयुक्त अस्तिक कुमार पांडे आणि विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर हे स्वतः लक्ष ठेवणार आहेत.
अचानक भेटींचा प्लॅन !
दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महसूल मनपा आणि पोलीस प्रशासन संचार बंदीची अंमलबजावणी कशा पद्धतीने करते यावर लक्ष ठेवण्यासाठी अचानक भेटींचा प्लॅन ठरविण्यात आला आहे. त्यानुसार दिवस जिल्हाधिकारी चौधरी, सायंकाळी आयुक्त पांडे, तर रात्री विभागीय आयुक्त केंद्रेकर शहरातील भागात अचानक भेटी देणार आहेत.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या या प्लॅन मुळे अधिकारी कर्मचारी मात्र चांगलेच धास्तावले आहेत.











