कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर गर्दी जमवू नये, या पोलिस प्रशासनाच्या आवाहनाला हिंदुत्ववादी संघटना विश्व हिंदू परिषद, बजरंग दल तसेच शिवसेना -भाजप या राजकीय पक्षांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे क्रांती चौक, गुलमंडी तसेच औरंगपुरा, टीव्ही सेंटर यासह इतर भागात होणारे जल्लोषाच्या कार्यक्रमांना ब्रेक लागला. शहरातील संस्थान गणपतीसह किराडपुरा राम मंदिर तसेच औरंगपूर्यातील राम मंदिरही रोषणाईने उजळून निघाले. मंदिरात आणि घरोघरी श्रीराम पूजनाचा कार्यक्रम साधेपणाने साजरा होत आहे.
अयोध्येतील श्रीराम मंदिर भूमिपूजनाच्या पार्श्वभूमीवर कालपासूनच शहरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. एकत्र जल्लोश करण्यावर मर्यादा आल्याने राम भक्तांनी घरोघरी भगवा ध्वज आणि गुढी उभारत आनंद साजरा केला. मंदिरा लगतचा परिसर सुशोभित करण्यात आला. त्याचबरोबर भगवे ध्वजही उभारण्यात आले आहेत. भाजपने शहरात गुलमंडी तसेच क्रांती चौकात प्रतिमा पूजनाची तयारी केली होती. मात्र पोलिस आयुक्तांनी या कार्यक्रमाला परवानगी नाकारली. त्यामुळे आता भाजपतर्फे नियमांचे पालन करीत प्रत्येक वार्डात कार्यक्रम होत आहेत. आमदार अतुल सावे यांच्या उपस्थितीत गारखेडा परिसरात तर राम पूजनाचा कार्यक्रम घेण्यात आला. जिल्हाध्यक्ष विजय औताडे यांनी हरसुल परिसरात श्रीराम पूजनाचा कार्यक्रम घेतला. तर टीव्ही सेंटर येथे नगरसेवक राजगौरव वानखेडे तसेच नगरसेवक नितीन चित्ते यांच्या उपस्थितीत श्रीरामाचे पूजन करण्यात आले. यावेळी राम भक्तांनी जय श्रीराम चे नारे दिले.
विश्व हिंदू परिषदेनेही कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्वच कार्यक्रम रद्द केले आहेत. राम भक्तांनी घरोघरी दिव्यांची रोषणाई करावी, घरावर भगवे ध्वज उभारावेत तसेच श्रीराम पूजन आणि आरती असे कार्यक्रम घेण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार शहरात जिल्हाभर घरोघरी दीप पूजन आणि आरती चे कार्यक्रम होत असल्याची माहिती विहिपचे जिल्हा मंत्री शैलेश पत्की यांनी दिली.
पोलिसांनी उधळले बजरंग दलाचे मनसुबे!
दरम्यान बजरंग दलातर्फे औरंगपूरा येथील महात्मा ज्योतिबा फुले पुतळ्याजवळ आज श्रीराम पूजनाचा कार्यक्रम घेण्यात येणार होता. सकाळी अकराच्या सुमारास बजरंग दलाचे कार्यकर्ते जमा झाले. मात्र पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी यांनी धाव घेत बजरंग दल कार्यकर्त्यांना रोखले. नियमांचे पालन करून श्रीराम पूजन करू द्यावे, अशी मागणी कार्यकर्ते करीत होते.
शिवसेनेनेही रद्द केले
शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी क्रांती चौकात श्रीराम पूजन करू द्यावे, यासाठी पोलिसांकडे परवानगी मागितली होती. मात्र पोलिसांनी नकार दिल्याने आता त्यांनी कार्यक्रम रद्द केला आहे. शिवसैनिकांनी घरीच श्रीरामाचे पूजन करावे असे आवाहन त्यांनी केले आहे. तर संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक काम कार्यक्रम रद्द केल्याची माहिती जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी दिली.