शहरात कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याची दखल घेऊन पालकमंत्री सुभाष देसाई यांनी स्वतंत्र कोविड रूग्णालय उभारण्याचा निर्णय घेतला. यासाठी मेल्ट्रॉन कंपनीची जागा निश्चित करण्यात आली. एमआयडीसीतील अधिकारी, जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनी २० दिवसांमध्ये मेल्ट्रॉन कंपनीच्या जागेत कोविड केअर सेंटर (सीसीसी) सुरू केले. रूग्णांच्या वाढत्या संख्येमुळे ‘सीसीसी’ ऐवजी डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटरचा (डीटीएचसी) दर्जा देण्याचा निर्णय झाला आहे. १५ जुलैपासून त्या अनुषंगाने रूग्णांवर उपचार करण्यात येणार आहे. यासाठी घनकचरा व्यवस्थापक नंदकिशोर भोंबे यांची मुख्य कार्यकारी अधिकारी तर वैद्यकीय अधिकारी वैशाली मुदगळकर यांची मेडिकल व्यवस्थापक म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचे मनपा आयुक्त अस्तिकुमार पांडे यांनी सांगितले.