हजारोंचे उत्पन्न आता लाखोंच्या घरात
पाच महिन्यांच्या खडतर लॉकडाऊन नंतर 20 ऑगस्ट पासून एसटीची चाके रुळावर येण्यास सुरुवात झाली आहे. मात्र सुरुवातीच्या काही दिवसात कोरोनाच्या भितीने प्रवाशांनी बसकडे पाठ फिरवल्याचे चित्र होते.आता मात्र प्रवाशांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे सुरुवातीला मागणीनुसार सोडण्यात येणार्या बसेस मध्ये औरंगाबाद परिवहन मंडळाने वाढ केली आहे.दररोज येणार्या आणि जाणार्या एसटींना निर्जंतुक केले जाते.खासगी वाहनांमध्ये एवढ्या प्रमाणात काळजी घेतली जात नाही.त्यामुळे कोरोनाच्या वातावरणात प्रवासी एसटीलीच प्राधान्य देत आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एसटी सेवा बंद होती.त्यामुळे महामंडळाचे प्रतिदिन 21 कोटी रुपयांचे उत्पन्न बुडत होते. एकीकडे प्रचंड तोटा सुरू झाला होता, तर दुसरीकडे खासगी वाहतूक सुरू झाल्याने एसटी बस सुरू करावी, अशी मागणी जनसामान्यांमधून करण्यात येत होती. काही दिवसांपूर्वी जिल्ह्यांतर्गत बससेवा सुरू करण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. अखेर शासनाने आंतरजिल्हा बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे एसटीतून प्रवास करणार्यांना ई-पासची आवश्यकता नाही. दररोज 20 ते 22 हजारांपर्यंत उत्पन्न होत होते. मात्र दररोज लाखोंच्या घरात उत्पन्न मिळत असून एसटी पूर्वपदावर येत आहे.