जिल्ह्याभरात सिंचनाची केलेली विविध कामे आणि परतीचा पाऊस यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील टँकरची संख्या गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा घटल्याचे दिसून आले. सध्या औरंगाबाद जिल्ह्यात फक्त पाच टँकर सुरू आहेत. गेल्या वर्षी ही संख्या 764 च्या घरात होती सिंचनाच्या कामामुळे टँकरची संख्या कमी झाली असल्याची माहिती समोर आली.
पाणीटंचाई निर्माण झालेल्या गावात जिल्हा प्रशासनाकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची सोय करण्यात येते. तसेच काही गावातील नागरिकांना पुरेसे पाणी उपलब्ध करण्यासाठी त्या गावाच्या परिसरात असलेल्या खाजगी विहीरींचे अधिग्रहण करण्यात येते. मागील वर्षी मार्च 2019 मध्ये पाणीटंचाई असलेल्या गावाला टॅंकरने पाणीपुरवठा करण्यासाठी 764 टँकर सुरू करण्यात आले होते. तर 414 विहिरींचे अधिग्रहण करून पाणीटंचाईवर मात करण्यात आली होती गेल्या वर्षभरात झालेल्या सिंचनाचे विविध कामे यामध्ये नाल्याचे खोलीकरण, शेततळे, जलयुक्त शिवार योजनेतून करण्यात आलेली विविध कामे यांचा समावेश होता तसेच परतीच्या पावसाने कृपादृष्टी केल्याने जमिनीतील पाणी पातळी वाढल्यामुळे यंदा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्याभरात फक्त पाच टँकर सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. जिल्ह्यात सुरू असलेली टँकरही औरंगाबाद तालुक्यातील सांजखेडा वस्ती येथे दोन टँकर पैठण तालुक्यातील बालानगर येथील दोन टँकर आणि गंगापूर तालुक्यातील आंबेगाव हैबतपुर मुस्तफाबाद येथे एक टँकर असे पाच टँकर सध्या सुरू करण्यात आले आहे. मागील वर्षी 4 मार्च 2019 रोजी जिल्ह्याभरात 764 टँकर सुरू करण्यात आले होते यामध्ये सर्वात जास्त टॅंकर हे गंगापूर तालुक्यात सुरू करण्यात आले होते. गंगापूर तालुक्यात 139 टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत होता तर सोयगाव तालुक्यात दोन टॅंकरने पाणीपुरवठा सुरू होतो याशिवाय जा गावात विहिरींना पाणी आहे. अशा खाजगी विहीरींचे अधिग्रहण करून पाणीपुरवठा करण्यात येत होता. यामध्ये सिल्लोड तालुक्यात सर्वात जास्त म्हणजे 87 विहिरीचे अधिग्रहण करण्यात आले होते. त्यापाठोपाठ वैजापूर तालुक्यात 86 विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले होते तर फुलंब्री तालुक्यातील 64 विहिरीचे अधिग्रहण करून टंचाईग्रस्त परिसरात पाणीपुरवठा करण्यात आला होता. यंदा जमिनीतील पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे सध्यातरी पाणी टंचाई जाणवत नसल्यामुळे टॅंकरने पाणीपुरवठा करणे किंवा विहीर अधिग्रहण करण्याची वेळ जिल्हा प्रशासनावर आलेले नाही असे मिळालेला आकडेवारीवरून दिसून येते. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा बोटावर मोजण्याइतके टॅंकर सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. शासनाने सिंचना संदर्भात केलेली विविध विकास कामे यामुळे जमिनीतील पाणी पातळीत वाढ झाल्याने पाणी टंचाई निर्माण होत नसल्याची माहिती समोर आली आहे.