या अपघातात नववधूची काकू आशामती विष्णू गायकवाड (वय 40 वर्षे), चुलत आजी तुळजाबाई दामोदर गायकवाड (वय 70 वर्षे) यांचा मृत्यू झाला, तर सख्खी आजी अहिल्याबाई दादाराव गायकवाड (वय 70 वर्षे) गंभीर जखमी झाली.
लष्करातून सेवानिवृत्त झालेले गंगाधर गायकवाड (रा. श्रद्धा कॉलनी, म्हाडा कॉलनी, धूत रुग्णालयासमोर) यांची मोठी मुलगी पूजा व जाधववाडीतील तुषार जगदाळे यांचा आज रविवारी सायंकाळी 6 वाजून 18 मिनिटांनी जालना रोडवरील कांचन लॉन्स येथे विवाह सोहळा आहे. या लग्न समारंभासाठी सर्व नातेवाईक शनिवारी सकाळपासूनच लग्नघरी येत होते. गंगाधर गायकवाड यांची आई अहिल्याबाई गायकवाड यादेखील आशामती व तुळजाबाई गायकवाड यांच्यासोबत शनिवारी दुपारी मंठा येथून एस.टी. बसने नातीच्या लग्नासाठी निघाल्या होत्या. सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास या तिघी धूत रुग्णालयासमोर बसमधून उतरल्या. बस पुढे जाताच त्या सर्व्हिस रोडच्या दिशेने जात असताना चिकलठाण्याकडून सुसाट वेगात आलेली होंडा सिटी कार (क्र.एम.एच. 01/पी.ए. 5691) रस्त्याच्या खाली उतरली आणि या कारने या तिघींना चिरडले. कार आधी एका झाडाला धडकली व पुढे एका बंद टपरीवर जाऊन आदळली.
या कारमध्ये दोन तरुण होते. केंब्रिज चौकातून सुसाट निघालेल्या या कारने प्रथम चिकलठाण्यातील हनुमान चौकात एकाला हूल दिली. त्यानंतर पुढे येताच मिनी घाटीसमोर शेगावहून पुण्याला जाणार्या मिलिंद देसाई (रा. सिंहगड रोड, पुणे) यांच्या स्विफ्ट डिझायर कार (क्र.एम.एच.12/एस.ई. 3236) ला मागून धडक दिली. त्यांना धडक देताच आणखी वेग वाढवून कारचालक पुढे निघाला आणि धूत रुग्णालयाच्या विरुद्ध दिशेला बसमधून उतरलेल्या तिघींना चिरडले. दरम्यान, देसाई यांनी तात्काळ एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. त्यावरून स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातग्रस्त कारमधील युवक पळताना सीसीटीव्हीत कैद झाले आहेत.
सुसाट कार पानटपरीला जाऊन धडकल्यानंतर टपरी उलटीपालटी झाली. रोज सायंकाळी सहा वाजता टपरी उघडते. शनिवारीही टपरीचालकाने तीच वेळ पाळली. त्यामुळे तो या अपघातातून बचावला. अपघातानंतर मोठ्या बॉम्बस्फोटासारखा आवाज ऐकू आला. परिसरातील नागरिक व व्यावसायिक सर्व जण घटनास्थळी धावून आले.
दोन महिलांना उडवणारा ‘तो’ कार चालक कोण?
पोलीस म्हणतात माहित नाही
औरंगाबाद जालना रोड वरील धुत हॉस्पिटल समोर झालेल्या भीषण अपघाताचे गुढ कायम आहे. एका होंडा सिटी कार (क्र. एम.एच. 01-पी.ए. 5691) चालकाने गाडी बेदरकारपणाने चालवून लग्नाला आलेल्या दोन महिलांना चिरडून ठार केले. ही घटना इतकी मोठी असून ही पोलिसांना या गाडी विषयी व त्याचा चालक मालक कोण? याचा थांगपत्ता लागलेला नाही.
या घटने विषयी सांजवार्ता प्रततिनिधीने सिडको एमआयडीसी पोलीस स्टेशनला माहिती साठी फोन केला असता तेथील ठाणे अंमलदार बावीस्करांनी या घटने संदर्भात काहीच माहित नसल्याचे सांगितले. घटनेची नोंद स्टेशन डायरीत आहे मात्र कारचा मालक - चालक कोण? या संदर्भात माहित नसल्याचे सांगण्यात आले.
या घटनेला तब्बल वीस तास उलटल्यानंतर ही पोलिसांना कारचा चालक मालक कोण हे माहित नसल्याचे आश्चर्य वाटतं. आरटीओ कार्यालयात प्रत्येक नोंद गाडीची नोंद असते. त्याच बरोबर ऍप वर गाडीचा नंबर टाकल्यास गाडी कुठली व कोणाची हे सहज कळतं.
मोठा अपघात झाल्यानंतर ही पोलिसांनी आत पर्यंत दोन महिलांना ठार मारणारा तो कार चालक कोणाच्या आशीर्वादाने मोकाट आहे; हे पोलिसांच्या भूमिकेवर वर संशय व्यक्त करण्यात येत आहे.