आज शेवटचा श्रावण सोमवार

Foto
ओम नमः शिवायच्या गजराने भक्‍तीमय झाले शहर
श्रावण महिन्याला मंगळवारी(दि.21) सुरुवात झाली असून आज शेवटचा श्रावण सोमवार असल्याने सर्वत्र घरोघरी महादेवाचे पूजन करून ओम नमः शिवायचा गजर करण्यात आला. यावर्षी कोरोनाचे सावट पसरल्याने इतिहासात पहिल्यांदाच शहरातील महादेव मंदिर बंद असल्याने भक्तांना मंदिराच्या बाहेरून यंदा दर्शन घ्यावे लागले. आज शेवटचा श्रावण सोमवार असल्याने भक्तांनी घरोघरी महापूजा करून ओम नमः शिवायचा गजर केला. 
श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी भक्तिभावाने महादेवाची पूजा करून आराधना केली जाते. यादिवशी उपवास केला जातो. दरवर्षी श्रावण महिन्यात मोठ्या संख्येने शहरातील खडकेश्वर महादेव मंदिरासह विविध महादेव मंदिरामध्ये भक्त दर्शनासाठी गर्दी करतात. महाभिषेक करून बेलपत्र वाहून ओम नमः शिवायचा जयघोष केला जातो. परंतु यंदा कोरोना महामारीमुळे यंदा महादेव मंदिर बंद ठेवण्यात आले. त्यामुळे भक्तांनी दुरूनच महादेवाचे दर्शन घेऊन ओम नमः शिवायचा जप केला. आज सायंकाळी खडकेश्वर महादेव मंदिराच्या वतीने माजी खा. चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते महापूजा करून आरती करण्यात येणार आहे. अशी माहिती खडकेश्वर महादेव मंदिराचे पुजारी रवींद्र चौधरी यांनी सांगितले. 
कावड यात्रेतून ओम नमः शिवायचा गजर
हर-हर महादेव कावड यात्रा समितीच्या वतीने दरवर्षी श्रावण मासनिमित्ताने कावड यात्रा काढण्यात येते. ही परंपरा यंदाही कायम ठेवत आज सकाळी ’हर हर महादेव’ म्हणत हर्सूल येथील हरसिद्धी माता मंदिर ते खडकेश्वर महादेव मंदिर मार्गे कावड यात्रा काढण्यात आली. यावेळी यात्रेत रथ, ओम नमः शिवायचा गजर करत भक्तांनी सहभाग नोंदविला. यावेळी आ.अंबादास दानवे, राजू वैद्य, बाळासाहेब थोरात, राजू दानवे, विश्वनाथ स्वामी, विजय वाघचौरे, बाबासाहेब डांगे, नंदकुमार घोडेले, बंडू ओक, संतोष जेजुरकर सह आदींनी सहभाग नोंदवला. हरसिद्धी माता मंदिर आणि खडकेश्वर महादेव मंदिर परिसरात महाभिषेक करून ओम नमः शिवायचा जयघोष केला. यावेळी संपूर्ण परिसर भक्तिमय झाला. 
घरोघरी ओम नमः शिवायचा गजर
आज शेवटच्या श्रावण सोमवारी महिलांनी पारंपरिक पद्धतीने घरोघरी पूजा करून ओम नमः शिवायचा जप केला. यावेळी काही महिलांनी 108 बेलपत्र वाहून ओम नमः शिवाय चा जप केला. तसेच महापूजा, अभिषेक, सत्यनारायण पूजा करण्यात आली. यावेळी अनेकांनी कोरोनाचे संकट ओढवल्याने मंदिरे देखील बंद करण्याची वेळ आली. यंदा पहिल्यांदाच श्रावण महिन्यात मंदिरात न जाताच पूजा करण्याची वेळ आली आहे. अशी खंत यावेळी व्यक्त करत हे संकट दूर कर. अशी प्रार्थना करून जणकल्याणासाठी पूजा केली.