जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी विनोद पाटील

Foto
औरंगाबाद जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीची बैठक नुकतीच पार पडली. या  बैठकीत सन 2020 च्या शिवजयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी विनोद पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली.
शनिवारी सिडको भागात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व जिल्हा  शिवजयंती महोत्सव समितीचे संस्थापक पृथ्वीराज पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीची बैठक  झाली. यावेळी माजी खासदार चंद्रकांत खैरे, आ. सतीश चव्हाण, आ. प्रदीप जैस्वाल, आ. अंबादास दानवे, आ. संजय शिरसाट, आ. विक्रम काळे, माजी आमदार  डॉ. कल्याण काळे, सुभाष झांबड, विलास औताडे प्रकाश मुगदिया, तनसुख झांबड, राजेंद्र दाते पाटील, अभिजीत देशमुख, अनिल पाटील मानकापे, बाळासाहेब थोरात, अनिकेत पवार, हरिश शिंदे, बाळासाहेब औताडे आदींची उपस्थिती होती. 
यंदा शिवजयंती महोत्सव भव्य-दिव्य प्रमाणात व मोठ्या उत्साहात साजरा करण्याचे बैठकीत ठरले.
 बैठकीचे प्रास्ताविक करताना राजेंद्र दाते पाटील यांनी औरंगाबाद जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीतर्फे शिवजयंतीनिमित्त गेली पाच दशके घेण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती उपस्थितांना दिली. याप्रमाणेच याही वर्षी विविध समाजोपयोगी उपक्रमांनी मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्याचे आवाहन त्यांनी केले. 
जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीची नूतन कार्यकारिणी लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती पृथ्वीराज पवार यांनी यावेळी दिली. बैठकीचे सूत्रसंचालन राजेंद्र दाते पाटील यांनी केले.