एकनाथ नगर वॉर्ड सध्या मुख्यत: पाणी, कचरा आणि देशी दारुचे असलेले दुकान या समस्यांनी हैरान झालेले आहे. गेल्या महापालिका निवडणुकीत एकनाथ नगर, फुले नगर वॉर्ड क्रमांक १०१ हा सर्वसाधारण महिलांसाठी राखीव होता . लता निकाळजे या वॉर्डाच्या सध्या नगरसेविका आहेत. आता हा वॉर्ड ९७ झालेला असून खुला झालेला आहे.संमिश्र वस्ती असलेल्या या भागात रस्ते, पाणी, कचरा या समस्या कायम आहेत.एकनाथ नगर, फुले नगर, द्वारकापुरी, तुलसी सोसायटी, महावीर नगर, स्वामी विवेकानंद नगर आदि भागांचा यात समावेश होतो.या भागात महानगरपालिकेची शाळा आहे परंतु आरोग्य केंद्र नाही. सध्या या भागातील अंर्तगत रस्त्यांची कामे पूर्ण झालेली असली तरी उस्मानपुरा,महात्मा फुले शाळा गाडे चौकासमोरील रस्ता मात्र अतिशय खराब अवस्थेत आहे. संपूर्ण रस्त्यावर खड्डेच खड्डे झालेले पाहायला मिळत आहे. या भागांमध्ये अनेक मोठ्या शैक्षणिक संस्था आहेत. या रस्त्यावर नेहमीच विद्यार्थ्यांची रेलचेल पाहायला मिळते. परंतु तरीदेखील हा मुख्य रस्ता सुधारण्यात येथील लोकप्रतिनिधींना यश आलेले नाही. रस्त्यांप्रमाणेच कमी वेळ येणारे पाणी हि समस्या देखील येथील नागरिकांनी मांडली आहे. शहरातील सर्वच भागांमध्ये पाणी पाच दिवसाआड येत असले तरी ते कमीतकमी एक तास सोडण्यात येते. परंतु या वॉर्डातील काही भागांमध्ये अतिशय कमी वेळ पाणी सोडण्यात येते. त्यामुळे पाण्यासंबंधी समस्यांना येथील नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. अनेकांना उन्हाळ्यात विकतचे पाणी देखील घ्यावे लागते. रस्ते साफ करण्यासाठी येणारे सफाई कामगार हे वरवर काम करतात त्यामुळे कचऱ्याची समस्या निर्माण होते अशी तक्रार नागरिकांनी यावेळी व्यक्त केली. या भागात लहान मुलांना खेळण्यासाठी म्हणून उद्यान देखील नाही. तसेच ठिकठिकाणी टवाळखोर मुले बसलेली असतात.या भागात प्रसिद्ध मैत्रेय बुद्ध विहार, नागसेन विद्यालय आहेत. एकप्रकारचे धार्मिक वातावरण असूनही याठिकाणी बसलेल्या टवाळखोरांमुळे वातावरण दूषित होते. त्याचप्रमाणे मुख्य चौकात दारुचे दुकान असल्यामुळे या भागातील बहुतेक तरुण हे दारुच्या आहारी गेलेले पाहायला मिळतात.कुठलाही कामधंदा ते करत नाही.याचमुळे चोऱ्यांचे प्रमाण देखील या भागात जास्त आहे. सदर दारुचे दुकान बंद करण्यासाठी या भागातील नागरिकांनी अनेक प्रयत्न केले, परंतु याचा काहीही फायदा झालेला पाहायला मिळत नाही.
-प्रज्वल फुलभाटी
चोऱ्यांचे प्रमाण जास्त
मुख्य रस्ते अजिबात चांगले नाहीत. पाणी देखील कमी येते.कचरा गाडी नियमित येते. लाईट पोल देखील आहेत.
मुख्य रस्ते अजिबात चांगले नाहीत. पाणी देखील कमी येते.कचरा गाडी नियमित येते. लाईट पोल देखील आहेत.
त्यांना येतांना जातांना टवाळखोरांचा त्रास होतो. चोरीचे प्रमाण देखील आमच्याकडे जास्तच आहे.
- उशा मनोहर
टवाळखोरांचा वाढता त्रास
या भागातील मुलींना टवाळखोरांचा त्रासाला सामोरे जावे लागते. मनपाचे कर्मचारी नियमित साफसफाई करत नाही. कचरा गाडी देखील रोज येत नाही. त्यामुळे दुर्गंधी च्या समस्येला सामोरे जावे लागते. पोलीस पेट्रोलिंग साठी इकडे कधीही येत नाही.
- जयंत जावळे
देशी दारुच्या दुकानामुळे त्रस्त
३)वॉर्डातील मुख्य चौकात असलेल्या देशी दारुच्या दुकानामुळे या भागातील तरुण व्यसनी झालेले आहेत. कलेक्टर ऑफिसला निवेदन दिले, आंदोलन केले परंतु काहीही फायदा झालेला नाही. या संदर्भात मोठे आंदोलन उभे करून दुकान बंद करण्यासाठी पुर्ण प्रयत्न करु.
- लता निकाळजे, नगरसेविका
सर्व भागात एक तास पाणी येते. काही भागांमध्ये समस्या आहेत. ३०० मिमीची ३२ लाखांची पाईपलाईन केलेली आहे.रस्त्यांचे टेंडर अडकलेले आहेत, त्यामुळे उर्वरित कामे लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करू.तसेच देशी दारुचे दुकान बंद करण्यासाठी मी स्वत: नागरिकांसोबत उपोषणाला बसले होते. येत्या काळात यासाठी मोठे आंदोलन उभारण्याचा विचार करत आहोत.