नवी दिल्ली- राफेल लढाऊ विमान खरेदीच्या सौदा प्रकरणात काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेले आरोप चुकीचे असून, आम्ही भारत सरकारसोबत काम करतो. आम्ही कोणत्याही पक्षासाठी काम करत नाही. आम्ही स्वत:हून राफेल करारासाठी रिलायन्स कंपनीची मुख्य निवड केली आहे. अशा शब्दात ‘दसॉल्ट’ कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एरिक ट्रॅपियर यांनी काँग्रेसचे अध्यक्ष खा. राहुल गांधी यांच्यावर पलटवार केला आहे.
‘दसॉल्ट’ ही कंपनी राफेल लढाऊ विमानांची निर्मिती करते. राफेल-रिलायन्सच्या भागिदारीवरुन खा. राहुल गांधी यांनी अनेक गंभीर आरोप केले होते. संरक्षण क्षेत्र आणि विमान निर्मितीमधील कोणताही अनुभव नसतानाही केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आशीर्वादाने ‘दसॉल्ट’ ने अनिल अंबानी यांच्या ‘रिलायन्स’ कंपनीला राफेलचे कंत्राट दिल्याचा आरोप खा.राहुल गांधी यांनी वारंवार केला आहे. या आरोपांच्या पार्श्वभूमीवर ट्रॅपियर यांनी ‘एएनआय’ वृत्तसंस्थेला मुलाखात दिली. राहुल गांधींच्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे सांगून ट्रॅपियर म्हणाले, राफेल डीलबद्दल मी खोटं बोलणार नाही. मी याधीही याबद्दल बोललो आहे.