राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल ? मंत्री पियुष गोयल यांनी मागितली माफी

Foto
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल होणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. अशातच, केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांनी प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याचे विधान एका मुलाखतीत केले होते. मात्र, पीयुष गोयल यांचा हा दावा प्रफुल्ल पटेलांनी फेटाळल्यानंतर पीयूष गोयल यांनीही यावर स्पष्टीकरण दिले आहे.

"एका ज्येष्ठ पत्रकाराने मला चुकीची माहिती दिली की श्री. प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत. माहितीची पडताळणी न करता मी माध्यमांना काही विधाने केली, परंतु नंतर मला कळले की ती माहिती चुकीची आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहे. दिशाभूल करणाऱ्या माहितीबद्दल मी माफी मागतो," असे ट्विट करत पीयूष गोयल यांनी स्पष्टीकरण दिले.


पीयूष गोयल काय म्हणाले होते?

पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांनी राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर बोलताना म्हटले होते, "एनसीपीचे नेतृत्व आता सुनेत्रा पवार यांच्याकडे असून प्रफुल्ल पटेल यांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे." या विधानामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. कारण अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाचे नेतृत्व अधिकृतपणे कोणाकडे जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.


प्रफुल्ल पटेल यांचे स्पष्टीकरण

पीयूष गोयल यांच्या विधानानंतर निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यासाठी प्रफुल्ल पटेल यांनी सोशल मीडियावर आपली भूमिका मांडली. "राष्ट्रवादी काँग्रेस हा लोकशाही तत्त्वांवर चालणारा पक्ष असून पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी, आमदारांशी, पदाधिकाऱ्यांशी चर्चा करुन तसेच आमच्या सर्व पक्ष सदस्यांच्या भावना आणि सामूहिक इच्छेचा आदर करूनच याबाबतचा निर्णय घेतला जाईल. एक राष्ट्रीय पक्ष म्हणून, अशा बाबींमध्ये आम्ही विहित प्रक्रियेचे काटेकोरपणे पालन करतो," असं प्रफुल्ल पटेल म्हणाले.


अजित पवारांच्या निधनानंतर राजकीय पेच

२८ जानेवारी रोजी झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. एकीकडे सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे, तर दुसरीकडे शरद पवार यांच्या गटाशी विलीनीकरणाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. अशा संवेदनशील वेळी पियुष गोयल यांनी पटेल यांच्या नियुक्तीचे विधान केल्याने महायुतीमध्ये समन्वयाचा अभाव आहे की काही पडद्यामागच्या हालचाली सुरू आहेत, असा प्रश्न उपस्थित होत आहे.