औरंगाबाद: औरंगाबाद लोकसभा निवडणुकीकरिता आज सकाळी सात वाजेपासून मतदान प्रक्रियेला उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली. शहर आणि ग्रामीण भागातील मतदारांमध्ये विशेष उत्साह दिसून आला. पहिल्यांदा निवडणूक करणार्या युवकांमध्ये मोठा उत्साह होता. मतदान केंद्रावर तसेच शहरात व जिल्ह्यात चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मतदारसंघात काही मतदान केंद्रावर इव्हीएम नादुरूस्त झाल्या होत्या. त्यामुळे काही वेळ मतदान प्रक्रिया थांबली होती; पण लगेचच दुसर्या मशिनद्वारे प्रक्रिया पार पाडण्यात आली. या मतदारसंघात 23 उमेदवार आपले नशीब अजमावत असले तरी खरी लढत काँग्रेस आणि शिवसेनेत होताना दिसून येत आहे. काँग्रेसतर्फे आ. सुभाष झांबड, शिवसेनेतर्फे चंद्रकांत खैरे, एमआयएमतर्फे आ. इम्तियाज जलील व शिवस्वराज्य बहुजन पक्षाचे हर्षवर्धन जाधव हे चार प्रमुख उमेदवार आपले नशिब अजमावत आहेत. दुपारी 12 वाजेपर्यंत सरासरी 20 टक्के मतदान झाले होते.
- सकाळच्या सत्रात मतदारांच्या रांगा
- पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
- काही केंद्रांवर इव्हीएममध्ये बिघाड
- विक्रमी मतदान होण्याची शक्यता
- नवमतदार, महिलांमध्ये मोठा उत्साह
शहरातील रेल्वेस्टेशन परिसरातील आयटीआय देवगिरी कॉलेज, पॉलेटेक्नीक महाविद्यालय येथील मतदान केंद्रावर मिलिंदनगर, नागसेननगर, कबीरनगर, एकनाथनगर, म.फुलेनगर, द्वारकापुरी, एमआयडीसी कॉलनी, रचनाकार कॉलनी, बन्सीलालनगर येथील मतदारांनी मतदान केले. समर्थनगर, औरंगपुरा, निरालाबाजार, सरस्वतीभुवन कॉलनी, जिजामाता कॉलनी, सिडको-हडको, गारखेडा परिसर, जवाहर कॉलनी, पुंडलिकनगर, हनमाननगर, मुकुंदवाडी, उस्मानपुरा, चिकलठाणा, नारेगाव, बेगमपुरा, मिलकॉर्नर, भोईवाडा, नंदनवन कॉलनी, शांतीपुरा, पदमपुरा, कर्णपुरा, छावणी, हर्सुल, एकतानगर, हर्षनगर, शहागंज, चेलीपुरा, किराडपुरा, रोशनगेट, मोंढा परिसर, क्रांतीचौक, कोटला कॉलनी, क्रांतीनगर, राहुलनगर आदी भागात उत्साहात मतदान होतांना दिसून आले.