चार वेळेस लॉक डाऊन करूनही शहरात दररोज २०० वर पॉझिटिव्ह रुग्ण आढळत आहेत. नेमके चुकले कुठे ? याचा शोध घेण्याची गरज आहे. गर्दी करू नका, सोशल डिस्टंसिंग पाळा, मास्क वापरा असे आवाहन करूनही जर रुग्ण संख्या आटोक्यात येत नसेल तर लॉक डाऊनशिवाय पर्याय नाही. सोमवारी शहरात लॉक डाऊनचा निर्णय होऊ शकतो. तेव्हा सावधान, विनाकारण फिरू नका. पोलीस तिसऱ्या हुकमापर्यंत मारतील असा थेट इशाराच आ. जैस्वाल यांनी कार्यकर्त्यांना दिला.
मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर आ. जैस्वाल यांच्या हस्ते गरजूंना रेशन किटचे वाटप करण्यात आले. शिवसेना शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, बंडू ओक आदींची यावेळी उपस्थिती होती. जैस्वाल म्हणाले, शहराची स्थिती बिघडत चालली आहे. दररोज दोनशेवर रुग्ण सापडत आहेत. यापूर्वी पोलिसांनी बळाचा वापर केला नाही. मात्र आता परिस्थिती अटीतटीची आहे. शहरवासीयच कडक लॉक डाऊन करण्याची मागणी करत आहेत. पोलीस प्रशासन, महसूल, मनपा प्रशासन आणि लोकप्रतिनिधी सर्वांच्या बैठकीत निर्णय होईल. मात्र हा निर्णय कठोरपणे राबवल्या जाईल एवढे निश्चित ! त्यामुळे उगाचच फिरू नका, पोलीस तिसऱ्या हुकमापर्यंत झोडतील, असा इशाराच आ.जैस्वाल यांनी दिला.












