वैजापूर तालुक्याला ४७ हजार मेट्रिक टन खताचा कोटा मंजूर

Foto
वैजापूर, (प्रतिनिधी) आगामी खरीप हंगामासाठी कृषी विभागाने वैजापूर तालुक्यास विविध रासायनिक खतांचे एकूण ४६ हजार ८३२ मेट्रिक टन आवंटन मंजूर केले आहे. यामध्ये युरिया व संयुक्त खतांचा सर्वाधिक समावेश असून, शेतकऱ्यांना वेळेत खत उपलब्ध व्हावे, यासाठी प्रशासनाने पूर्वनियोजन सुरू केले आहे.

जिल्हास्तरीय मंजूर आवंटनानुसार वैजापूर तालुक्यास युरिया खताचे १७ हजार ३२८ मे. टन आवंटन करण्यात आले आहे. याशिवाय डीएपी खत ३ हजार ५२० मे.टन, एमओपी ८०० मे.टन, संयुक्त खतांचा १९ हजार ५६८ मे. टन तर एसएसपी खतांचा ५ हजार ६१६ मे.टन साठा मंजूर करण्यात आला आहे. तालुक्यात एकूण ४६ हजार ८३२ मे.टन खतांचा पुरवठा होणार असल्याने खरीप हंगामात खत टंचाई कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वीच खतांची मागणी वाढत असल्याने कृषी विभागाने कंपन्या व विक्रेत्यांसोबत समन्वय साधून पुरवठा सुरळीत ठेवण्याची तयारी केली आहे. विशेष म्हणजे, संयुक्त खतांना यंदा सर्वाधिक मागणी राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. माती परीक्षणानुसार भर संतुलित खतवापरावर देण्यात येत असून, शेतकऱ्यांना शिफारसीनुसारच खतांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. खत विक्रेत्यांना ई-पॉसने खत विक्री करणे अनिवार्य आहे. कुणीही खत, युरिआ व इतर बाबींचा साठा करू नये. नियम डावलून विक्री करणाऱ्या तालुक्यातील मनूर येथील प्रणीत व हनुमंतगाव येथील श्री महालक्ष्मी या दोन दुकानदारांचा परवाना रद्द करण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.

प्रशासनाने आवाहन
 काही ठिकाणी खतांची कृत्रिम टंचाई निर्माण होऊ नये. तसेच जादा दराने विक्री होऊ नये यासाठी कृषी विभागाकडून तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी खत खरेदी करताना पक्के बिल घ्यावे, अधिकृत विक्रेत्याकडूनच खत खरेदी करावे. तसेच कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा असेही कृषी अधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे. 

वैजापूर तालुक्यात कापूस, मका, सोयाबीन, बाजरी, कांदा तसेच भाजीपाला पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली. मार्च महिन्यापासून युरिया व डीएपीचा अतिरिक्त साठा करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी गोंधळून न जाता आवश्यकतेनुसार खतांची खरेदी करावी. तसेच गोणीवर असलेल्या एमआरपी नुसार खत खरेदी करावे.
- जे. डी. वाघमारे, कृषी अधिकारी, पंचायत समिती, वैजापूर