चांदगुडे कुटुंबाच्या मृत्यूचे गूढ कायम !

Foto
कारण अनुत्तरित; पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): क्षणभराचा राग आणि कौटुंबिक नैराश्यातून खवड्या डोंगरावर घडलेल्या चांदगुडे कुटुंबाच्या सामूहिक मृत्यूच्या घटनेने अवघे शहर हादरले आहे. १८ वर्षीय कुणाल, त्याचे वडील मुरलीधर आणि आई संगीता या तिघांचा एकाच वेळी करुण अंत झाल्याने संपूर्ण कुटुंबच उद्धस्त झाले. या घटनेमुळे टोकाचे पाऊल उचलण्याइतका नेमका कोणता वाद किंवा तणाव होता, याचे उत्तर आता कायमचे अनुत्तरित राहण्याची भीती व्यक्त होत आहे. कुटुंबातील तिन्ही सदस्य हयात नसल्याने, पोलिसांचा पुढील तपास केवळ 'अकस्मात मृत्यू'च्या नोंदीपुरताच मर्यादित राहण्याचीही शक्यता निर्माण झाली आहे.
घटनेनंतर दोन्ही बाजूंच्या नातेवाइकांमध्ये जुन्या घटनांचे संदर्भ देऊन आरोप
प्रत्यारोपांच्या जोरदार फैरी झडत आहेत. मृत्यूच्या सहा दिवसांपूर्वी संगीता यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करून नणंदांवर गंभीर आरोप केले होते. यावर मुरलीधर यांच्या बहिणीने प्रत्युत्तर देत संगीता व कुणालनेच मुरलीधर यांना घराबाहेर काढल्याचा दावा केला. दुसरीकडे, संगीता यांच्या बहिणीने सासरच्या आरोपांवर संताप व्यक्त करत उलट सवाल उपस्थित केले आहेत. दरम्यान, एमआयडीसी वाळूज पोलिसांनी धनगर पिंपळगाव येथे जाऊन मुरलीधर यांच्या आई-वडिलांसह तीन बहिणींचे जबाब नोंदवले. त्यांनी कौटुंबिक वाद नसल्याचे सांगत कोणतीही तक्रार नसल्याचे स्पष्ट केले. संगीता यांच्या माहेरच्यांचे जबाब घेणे बाकी असून, या सामूहिक मृत्यूमागचे मूळ कारण शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. दरम्यान, सोशल मीडियावर समोर आलेल्या नव्या व्हिडिओमुळे संगीता यांनी खाली उडी मारली की? खाली पाहताना त्यांचा पाय घसरून तोल गेला, याबाबत नवा संशय आणि चर्चा सुरू झाली आहे.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions