छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : ग्रामीण भागात कुटुंबीय शेतात गेल्यावर दिवसा घरे फोडणार्या टोळीतील अरुण ऊर्फ आवड्या अभिमान काळेे (२५, रा. पारनेर, ता. पाटोदा, जि. बीड), असे अटकेतील आरोपीचे नाव असून त्याचे अन्य तीन साथीदार फरार आहेत. त्यांचा शोध सुरु आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांनी दिली. त्याच्याकडून १६ ग्रॅम सोने व ५ हजार रुपये रोकड, असा २.६१ लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. २६ जानेवारीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शहागड येथे ही कारवाई केली.
२२ जानेवारी रोजी सोमीनाथ शामराव हुलसार (४०, रा. खोडेगाव, ता. छत्रपती संभाजीनगर) हे घराला कुलूप लावून कुटुंबीयांसह शेतात गेले होते. दुपारी अरुण ऊर्फ आवड्याच्या टोळीने त्यांचे घर फोडून सुमारे २ लाख २६ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. या प्रकरणी २४ जानेवारीला चिकलठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक महेश घुगे, अंमलदार कासीम शेख, प्रमोद पाटील, सचिन राठोड, सुनील गोरे, बलविरसिंग बहुरे, शिवाजी मगर, योगेश तरमळे, जीवन घोलप, ठसेतज्ज्ञ विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक पठाण, हवालदार परमेश्वर आडे यांनी सुरु केला.
खोडेगाव भागात अनेक स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपास सीसीटीव्ही तपासले. २६ जानेवारीला शहागड येथील आवड्या आणि त्याची टोळी असल्याचे निष्पन्न झाले. जुन्या पुलावरून गावात येत असल्याची खबर मिळताच पोलिसांनी सापळा रचून अरुण ऊर्फ आवड्याला पकडले.













