'संतपीठ, आयटीआय वसतीगृह बांधकाम विस्तारासाठी निधी उपलब्ध करावा'

Foto
रमेश लिंबोरे

पैठण : तालुक्यातील विविध प्रलंबित विकासकामांसाठी चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनात तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे.

संतपीठ पूर्ण क्षमतेने चालवण्यासाठी, कै. बाळासाहेब पाटील शासकीय वस्तू संग्रहालयाच्या विस्तारासाठी, आयटीआयच्या दुसऱ्या मजल्याच्या विस्तारासाठी, वस्तीग्रह बांधकामासाठी, शहरात डीएड कॉलेज सुरू झाल्यापासून भाड्याच्या इमारतीमध्ये आहे डीएड कॉलेजच्या स्वतंत्र इमारत बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी पैठणकरांकडून केली जात आहे.

पैठण ते हिरडपुरी पर्यंत गोदावरी नदीवर बांधण्यात येणाऱ्या घाटासाठी निधी उपलब्ध करून जलद गतीने काम सुरू करावे, ब्रह्मगव्हाण जलसिंचन योजनेच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामासाठी जास्त निधी देऊन हे काम जलगतीने पूर्ण करण्यात यावे. सदरील प्रकल्प पूर्ण झाल्यास अनेक गावातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न, जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, सिंचनासाठी याचा फायदा होणार आहे. 

बंद पडलेल्या जलविद्युत (हायड्रो) केंद्रसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनात निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी करण्यात येत आहे. अपूर्ण अवस्थेतील पाणीपुरवठा योजना, शासकीय इमारतींच्या दुरुस्तीचे प्रस्ताव मागील काही वर्षांपासून प्रलंबित असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

 स्थानिक लोकप्रतिनिधींनी अधिवेशनादरम्यान या विषयाकडे शासनाचे लक्ष वेधले पाहिजे. ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई गंभीर बनली. अनेक गावांतील रस्त्यांची अवस्था बिकट आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित विभागांनी तातडीने प्रशासकीय मान्यता देऊन निधी वितरित करावा, अशी मागणी करण्यात आली.