छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) वाळूज परिसरातील एका
नामांकित कंपनीतून कामगारांना घेऊन जाणाऱ्या बसला गुरुवारी (दि. २) मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला. अहिल्यानगर ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील लक्ष्मी माता मंदिराजवळ रस्त्यात उभ्या असलेल्या एका बंद ट्रॅक्टरवर कंपनीची बस पाठीमागून जोरात आदळली. या अपघातात बसचालकाचा जागीच मृत्यू झाला तर २५ कामगार जखमी झाले. यातील ४ जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
शितलसिंग उमरसिंग जाधव (वय ५५, रा. कार्तिकनगर, मयूरपार्क, हसूल) असे मृत पावलेल्या दुर्दैवी बसचालकाचे नाव आहे. वाळूज येथील कंपनीतील ४० कामगारांना शिफ्ट संपल्यानंतर घरी सोडण्यासाठी बस नेहमीप्रमाणे रात्री निघाली होती. रात्री साधारण १ वाजेच्या सुमारास बस छावणी परिसरातील लक्ष्मी माता मंदिर परिसरात आली असता, मुख्य रस्त्यावर एक ट्रॅक्टर बंद अवस्थेत उभे होते. अंधारामुळे चालकाला उभ्या ट्रॅक्टरचा अंदाज आला नाही आणि बस थेट ट्रॅक्टरवर पाठीमागून आदळली. धडक एवढी भीषण होती की बसच्या समोरील भागाचा पूर्णपणे चक्काचूर झाला आणि चालक शितलसिंग हे केबिनमध्येच अडकले.
स्थानिकांची मदतीसाठी धाव
अपघात झाल्यानंतर परिसरातील नागरिकांनी आणि प्रत्यक्षदर्शीनी पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. नागरिकांनी जखमींना बसबाहेर काढण्यास सुरुवात केली. केबिनमध्ये अडकलेल्या चालकालाही बाहेर काढण्यात आले, मात्र रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. गंभीर जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून चार जणांची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात ट्रॅक्टर आणि बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions













