छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : महानगरपालिकेचे आयुक्त अमोल येडगे व्यांच्या निर्देशानुसार, अतिरिक्त आयुक्त-२ कल्पिता पिंपळे यांच्या मार्गदर्शनाखाली दि. ३ जुलै रोजी आयएमए हॉल, समर्थनगर येथे महानगरपालिकेच्या सर्व आरोग्य केंद्रांमध्ये उच्च दर्जाची स्वच्छता राखण्याच्या उद्देशाने विशेष मार्गदर्शन बैठक आयोजित करण्यात आली.
या बैठकीत अतिरिक्त आयुक्त पिंपळे प्यांनी राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत बाह्यस्त्रोत यंत्रणेमार्फत कार्यरत असलेल्या सर्व सफाई कर्मचारी, सेवक व सेविकांना मार्गदर्शन केले. यावेळी शहर कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. ज्ञानेश्वर चौधर उपस्थित होते. बैठकीदरम्यान वैयक्तिक स्वच्छता, सार्वजनिक स्वच्छता तसेच आरोग्य केंद्रांतील दैनंदिन स्वच्छता व्यवस्थापन या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. स्वच्छ, सुरक्षित व नागरिकाभिमुख आरोग्य सेवा
उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक कर्मचाऱ्याने आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी, असे आवाहन करण्यात आले. या मार्गदर्शन बैठकीस राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत बाह्य स्त्रोत यंत्रणेद्वारे कार्यरत सुमारे १५० सफाई कर्मचारी, सेवक व सेविका उपस्थित होते. ज्या ठिकाणी स्वच्छतेबाबत गंभीर निष्काळजीपणा आढळून येईल, त्या प्रकरणी
संबंधितांवर नियमानुसार प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले. यासोबतच सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळेत गणवेश व ओळखपत्र अनिवार्यपणे परिधान करावे, तसेच त्याबाबत कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही, अशा स्पष्ट सूचनाही देण्यात आल्या.













