चार तासात पकडली केवळ ३ कुत्री मनपाचे पथक सुस्त; मोहीम फ्लॉप

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : शहरात मोकाट कुत्र्यांची दहशत दिवसेंदिवस वाढत असून, सातारा परिसरातील उमानगरमध्ये एका तीन वर्षांच्या चिमुकलीचे कुत्र्यांनी लचके तोडल्याची थरारक घटना समोर आली आहे. गंभीर जखमी अवस्थेत या मुलीवर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या घटनेमुळे नागरिकांमध्ये पसरलेला संताप शांत करण्यासाठी मंगळवारी (दि.९) महानगरपालिकेने कुत्रे पकडण्याचे फार्स सुरू केले. परंतु, तब्बल चार तास राबवलेल्या या मोहिमेत
पथकाला केवळ तीन कुत्री पकडण्यात आली, ज्यामुळे प्रशासनाच्या गांभीर्यावर नागरिक संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.
सातारा परिसरातील उमानगर येथील सृष्टी निखिल बाहेती ही चिमुकली शनिवारी सायंकाळी घरासमोर खेळत असताना एका मोकाट कुत्र्याने तिच्यावर हल्ला केला. कुत्र्याने कान, डोके, मान, पाठीला चावा घेतला. चिमुकलीला वाचविण्यासाठी नागरिकांनी धाव घेत कुत्र्याच्या तावडीतून सोडविले. या घटनेमुळे परिसरात कुत्र्यांची दहशत पसरली आहे. मंगळवारी महापालिकेच्या
पथकाने या भागात कुत्रे पकडण्याची मोहीम राबविली. त्यासाठी दोन वाहनांसह पथके पाठविण्यात आली होती.
जखमीच्या कुटुंबियांशी भेट
चार तास या पथकांनी परिसरातील मोकाट कुत्र्यांचा शोध घेतला पण फक्त तीनच कुत्री आढळून आली. बुधवारी (दि.१०) पुन्हा एकदा पथक या भागात पाठविले जाणार आहे. दरम्यान, महापालिका अधिकाऱ्यांनी जखमी मुलीच्या कुटुंबीयांची देखील भेट घेतल्याचे प्रभारी मुख्य पशुसंवर्धन अधिकारी शेख शाहेद यांनी सांगितले.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions