छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): शहरातील जिन्सी परिसरातील गिरणी मैदानाजवळ शनिवारी रात्री हृदयद्रावक दुर्घटना घडली. एका गोदामावर आलेल्या कंटेनरला मुख्य विद्युत वाहिनीची तार अडकून तुटल्याने कंटेनरमध्ये विजेचा हायव्होल्टेज प्रवाह उतरल्याने एका २१ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचा एक मित्र मृत्यूशी झुंज देत आहे. हे दोन्ही तरुण गरिबीमुळे शिक्षण सांभाळून गोदामावर हमालीचे काम करत होते. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. उबैद खान फारुख खान (रा. निजामगंज कॉलनी, संजयनगर) असे मृताचे नाव आहे, तर जैद इस्माईल शेख (वय २०, रा. संजयनगर) असे जखमीचे नाव आहे.
नेमके काय घडले?
▶ शनिवारी रात्री १० च्या सुमारास जिन्सी येथील गिरणी मैदानाजवळील एका गोदामावर जुने फ्रीज, कुलर आणि इतर साहित्य घेऊन एक मोठा कंटेनर आला होता. चालक कंटेनर पार्क करत असताना, वरील सामान रस्त्यावरून गेलेल्या मुख्य विद्युत तारेत अडकले. चालकाच्या हे लक्षात येण्यापूर्वीच ती विद्युत तार तुटली आणि थेट कंटेनरवर पडली. यामुळे काही सेकंदातच संपूर्ण कंटेनरमध्ये वीजप्रवाह पसरला. कंटेनरमधील सामान उतरवण्यासाठी आलेले उबैद खान आणि जैद शेख हे दोघे गाडीजवळच उभे होते. कंटेनरला स्पर्श होताच दोघांनाही विजेचा तीव्र धक्का बसला आणि ते गंभीर जखमी झाले.
महावितरणची तत्परता
स्थानिक नागरिक रफिक शेख यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने महावितरणच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला. महावितरणनेही विलंब न लावता मुख्य वीज वाहिनीचा पुरवठा खंडित केला, ज्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी मोठ्या हिंमतीने दोन्ही तरुणांना तातडीने एमजीएम रुग्णालयात दाखल केले. अतिदक्षता विभागात तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी उबैद खान याला मृत घोषित केले. तर त्याचा मित्र जैद शेख याच्यावर सध्या अतिशय गंभीर अवस्थेत उपचार सुरू आहेत.
▶ कुटुंबाचा आधार हिरावला
उबैद आणि जैद या दोघांचीही घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची आहे. घरच्यांना आर्थिक मदत व्हावी आणि स्वतःच्या शिक्षणाचा खर्च सुटावा, म्हणून दोघेही कॉलेज सांभाळून रात्रीच्या वेळी या गोदामावर काम करायचे. कष्टाळू तरुणासोबत घडलेल्या या दुर्दैवी प्रसंगामुळे संजयनगर आणि जिन्सी परिसरात शोककळा पसरली आहे. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी पोलीस ठाण्यात कोणतीही अधिकृत नोंद झाली नव्हती.
▶ रुग्णालयात गर्दी
उबैदच्या मृत्यूची आणि जैदच्या गंभीर प्रकृतीची बातमी वाऱ्यासारखी पसरताच जिन्सी परिसरातील शेकडो नागरिक आणि तरुणांचे गट एमजीएम रुग्णालयाबाहेर जमा झाले. जखमी मित्राला मदत करण्यासाठी आणि कुटुंबाला धीर देण्यासाठी रात्री उशिरापर्यंत रुग्णालयाच्या आवारात मोठी गर्दी दिसून आली.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions