तालुक्यात तातडीने पंचनामे करून मदत करण्याचे दिले निर्देश
फुलंब्री (प्रतिनिधी) अवकाळी पावसामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, गेवराई पायगा परिसरातील शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले आहे. कष्टाने उभे केलेले पीक काही क्षणातच नष्ट झाल्याने शेतकरी हवालदिल झाले असून, ही परिस्थिती अत्यंत वेदनादायी असल्याचे चित्र आहे.
या पार्श्वभूमीवर फुलंब्री विधानसभेच्या आमदार अनुराधा चव्हाण यांनी गेवराई पायगा येथे जाऊन नुकसानग्रस्त शेतीची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले. पात्र शेतकऱ्यांना लवकरात लवकर योग्य ती आर्थिक मदत मिळावी, यासाठी प्रशासनाने तत्परतेने कार्यवाही करावी, असे निर्देशही दिले. या कठीण प्रसंगी शेतकरी बांधवांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून, सरकार दरबारी त्यांना योग्य न्याय व मदत मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत,
असा विश्वास आमदार चव्हाण यांनी व्यक्त केला.
यावेळी तहसीलदार योगीता खटावकर, फुलंब्री पंचायत समिती सभापती सर्जेराव मेटे, जि. प. सदस्य गोपाल वाघ, पं. स. सदस्य सविता कोलते, तालुका कृषी अधिकारी पंकज वाकळे, सहायक कृषी अधिकारी सचिन रगडे, राजु तुपे, विजय आहेर यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.










