फॉर्म माझ्या बॅगेत, विधानपरिषद दिली तर शिंदेंचा पाईक म्हणून काम करु, पण..., बच्चू कडूंनी अटी शर्ती सांगितल्या

Foto
मुंबई : पदासाठी युती करणारा बच्चू कडू नाही. मुद्यांसाठी युती करणारे आहोत. नुसत्या आमदारकीसाठी बच्चू कडू जाईल एवढा नालायक नाही, अशी प्रतिक्रिया माजी मंत्री आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्वेसर्वा बच्चू कडू यांनी दिली. शिवसेनेकडून विधान परिषदेसाठी बच्चू कडू यांच्या नावाची शिवसेनेकडून चर्चा सुरु होती. तसेच विधान परिषदेवर जायचे असल्यास प्रहार जनशक्ती पक्ष शिवसेनेत विलीन करा, अशी अट शिवसेनेने बच्चू कडूंना घातल्याची माहितीही समोर आली होती. या सगळ्या चर्चांनंतर आज बच्चू कडू यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत बच्चू कडू यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले.
 
फॉर्म माझ्या बॅगेत, विधानपरिषद दिली तर शिंदेंचा पाईक म्हणून काम करु...पण आमच्यासाठी दिव्यांग बांधव आमच्यासाठी महत्वाचे आहे. शेतकरी मजूर आमच्यासाठी आई-वडिलांसारखे आहेत. पदासाठी युती करणारा बच्चू कडू नाही, असंही बच्चू कडू यांनी सांगितले. १ लाख पेक्षा जास्त सदस्य प्रहार संघटनेचे आहे. शिवसेनाच्या बंडखोरीतून प्रहार संघटना समोर आली. मी एकमेव माणूस आहे की, मी कुणाला पाठिंबा नव्हता, ना कधी पाठिंबा घेतला. विलनिकरणाची चर्चा बघितली, वाईट वाटलं. बातमीतून बातमी तयार झाली आहे, असं बच्चू कडू यांनी स्पष्ट केले.
 
एकनाथ शिंदेंच्या बंडावेळी बच्चू कडूंनी दिली होती साथ
प्रहार जनशक्ती पक्षाची बच्चू कडूंकडून १९९९ ला स्थापना करण्यात आली. एकनाथ शिंदेंच्या बंडावेळी बच्चू कडूंनी साथ दिली होती. मात्र २०२४ च्या निवडणुकीत बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदेंपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. २०२४ ला प्रहार जनशक्तीने ३८ जागा लढवल्या होत्या. पण सर्व जागी पराभूत त्यांचे उमेदवार पराभूत झाले. २०२४ च्या विधानसभेच्या निवडणुकीत प्रहार जनशक्तीला १.५५ टक्के म्हणजेच ३.०७ लाख मतं मिळाली होती. 

विधान परिषदेसाठी भाजपकडून कोणाला संधी
भाजपकडून विधान परिषदेसाठी सुनिल कर्जतकर, माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे आणि प्रमोद जठार यांची नावे जाहीर करण्यात आली आहे. तर विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी प्रज्ञा सातव यांचं नाव जाहीर करण्यात आलं आहे.

विधान परिषदेचा एक आमदार निवडून येण्यासाठी २८ मतांचा कोटा
विधान परिषदेच्या निवडणुकीची घोषणा होताच भाजप, शिवसेना शिंदे गट, शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या इच्छुक उमेदवारांची नाव समोर आली आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपच्या वाट्याला ६, शिवसेना २, राष्ट्रवादी १ आणि महाविकास आघाडी १ जागा येणार आहे. विधान परिषदेचा एक आमदार निवडून येण्यासाठी २८ मतांचा कोटा आवश्यक आहे. महायुतीत भाजप (१३१ आमदार), एकनाथ शिंदे यांची शिवसेना (५७ आमदार) आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी (४० आमदार) असे बलाबल पाहता महायुतीचे ८ उमेदवार सहज निवडून येऊ शकतात. तर महाविकास आघाडीचे एकूण संख्याबळ ४६ आहे. त्यामुळे त्यांचा केवळ एकच उमेदवार सहज निवडून येऊ शकतो.