आंदोलनाची कोणतीही घोषणा केलेली नाही, कॉकरोच जनता पार्टीच्या अभिजीत दिपकेंचा नवा व्हिडीओ व्हायरल...

Foto
 नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियासह देशभरात जोरदार चर्चेत असलेले कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ जारी केला आहे. कॉकरोच जनता पार्टीच्या नावाने काही ठिकाणी निदर्शने केली जाणार आहेत, मात्र या आंदोलनांशी आपला कोणताही संबंध नाही,ङ्घङ्घ असे दिपके यांनी स्पष्ट केले आहे. तसेच, समर्थकांनी घाईघाईने कोणताही चुकीचा निर्णय घेऊ नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.

इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत अभिजीत दिपके म्हणाले, मला एक गोष्ट स्पष्ट करायची आहे की, काही जण कॉकरोच जनता पार्टीच्या नावाने निदर्शने करत आहेत. मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की, आपण कुठल्याही आंदोलनाची घोषणा केलेली नाही आणि आपण आता आंदोलन करणार नाही. कॉकरोच जनता पार्टीच्या सर्व समर्थकांना विनंती आहे की, घाईघाईने असा कुठलाही निर्णय घेऊ नका, ज्यामुळे आपल्या चळवळीवर परिणाम होईल. सरकारला आपण एक चूक करावी, हेच हवं आहे. त्यामुळे आपण तसं करु नये. ही मोठी लढाई आहे आणि आपल्याला काळजी घ्यावी लागणार आहे.त्यांनी पुढे आरोप केला की, आज काही ठिकाणी लोक आंदोलने करणार आहेत, मात्र त्यात आपला काहीही संबंध नाही. ज्या लोकांना आपल्यापासून त्रास होत आहे, ते लोक मुद्दामून अशा कृत्यांनी आपल्याला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत.

इन्स्टाग्राम खाते हॅक आणि डिलिट
दरम्यान, मूळचे महाराष्ट्रातील असलेले आणि सध्या अमेरिकेतील बोस्टन येथे शिक्षण घेत असलेल्या अभिजीत दिपके यांच्या कॉकरोच जनता पार्टीची सोशल मीडियावर प्रचंड क्रेझ निर्माण झाली होती. इन्स्टाग्रामवर या पार्टीच्या फॉलोअर्सची संख्या तब्बल २ कोटींच्या पार गेली होती. मात्र, दिपके यांनी आधीच भीती व्यक्त केल्याप्रमाणे त्यांची सोशल मीडिया खाती हॅक करण्याचा प्रयत्न यशस्वी झाला आहे. अभिजीत यांचे वैयक्तिक इन्स्टाग्राम खाते हॅक झाले असून, बॅकअप म्हणून तयार केलेले कॉकरोच जनता पार्टीचे अधिकृत खाते देखील हटवण्यात आले आहे.

कॉकरोच जनता पार्टीला तरुणांचा उदंड प्रतिसाद
काही दिवसांपूर्वी एका सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी देशातील युवकांचा उल्लेख परजीवी आणि झुरळं असा केला होता. या वक्तव्यानंतर दुसर्‍याच दिवशी त्यांनी स्पष्टीकरण दिले असले, तरी युवकांमध्ये तीव्र संताप होता. याच वक्तव्याचा निषेध म्हणून अभिजीत दिपके यांनी इन्स्टाग्रामवर कॉकरोच जनता पार्टी नावाचे डिजिटल पेज सुरू केले, ज्याला देशातील तरुणांनी उदंड प्रतिसाद दिला.

धमक्यांचे सत्र आणि एक्स खात्यावर बंदी
अभिजीत दिपके यांनी त्यांना येणार्‍या धमक्यांचे व्हिडिओ आणि पोस्ट एक्स प्लॅटफॉर्मवर शेअर केले आहेत. तसेच कॉकरोच जनता पार्टीचे अधिकृत एक्स खाते भारतात ब्लॉक करण्यात आले आहे, ज्यावर २ लाख १ हजार फॉलोअर्स होते. त्यानंतर दिपके यांनी कॉकरोच इज बॅक या नावाने नवीन खाते सुरू केले असून, अवघ्या काही दिवसांत या नवीन खात्याचे फॉलोअर्स १ लाख ८७ हजारांवर पोहोचले आहेत.

९४% फॉलोअर्स भारतीय, मग पाकिस्तानी ठरवण्याची घाई का?
आपल्याला बदनाम करण्यासाठी आयटी सेल सक्रिय असल्याचा आरोप दिपके यांनी केला आहे. कॉकरोच जनता पार्टीचे ९४ टक्के फॉलोअर्स हे भारतीय नागरिक आहेत. असे असतानाही या चळवळीला पाकिस्तानी ठरवण्याची घाई काही लोक का करत आहेत? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. सायबर हल्ले आणि धमक्यांनंतरही ही डिजिटल लढाई शांततापूर्ण मार्गाने लढणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.