छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): रांजणगाव फाट्याजवळील एका टूल्स विक्रीच्या दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी तब्बल ६० लाख रुपयांचे सीएनसी व व्हीएमसी मशिनरीचे महागडे कटिंग टूल्स चोरून नेल्याची घटना रविवारी (दि.७) सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे वाळूज औद्योगिक क्षेत्रातील व्यापाऱ्यांमध्ये सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रांजणगाव फाट्याजवळ ई-३४ सेक्टरमध्ये जितेंद्र साळुंके यांचे 'लक्ष्मी इंटरप्रायजेस' नावाने टूल्स विक्रीचे दुकान आहे. पवन सरोदे हे तिथे टूल्स डिलिव्हरीचे काम करतात. शनिवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे दुकान बंद करण्यात आले होते. रविवारी सकाळी शेजारील एका ट्रान्सपोर्ट चालकाला दुकानाचे शटर उचकटलेले दिसले. त्यांनी तातडीने
पवन सरोदे यांना फोन करून याची माहिती दिली. त्यानंतर मालक साळुंके आणि सरोदे यांनी दुकानात धाव घेतली असता, दुकानातील सीएनसी आणि व्हीएमसी मशिनरीचे सुमारे ६० लाख रुपये किमतीचे कटिंग टूल्स चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी वाळूज पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.
सीसीटीव्हीत चोरटे कैद
घटनेनंतर पोलिसांनी दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. यात रविवारी पहाटे सव्वातीन वाजेच्या सुमारास तोंडाला रुमाल बांधलेले दोन चोरटे दुकानातून वेगाने टूल्स पळवताना कॅमेऱ्यात स्पष्ट दिसत आहेत. या फुटेजच्या आधारे पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरू केला असून, रात्री उशिरापर्यंत वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions













