पैठण, (प्रतिनिधी) : राज्यात व केंद्रात भाजपची सत्ता असल्याने शहराच्या विकास कामासाठी निधीची कमतरता भासणार नाही यासाठी पैठणकरांनी भाजपचा नगराध्यक्ष व नगरसेवक निवडून द्यावे असे आवाहन माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी पैठण येथे कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना केले.
याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष शिरसाठ, एकनाथ जाधव, तुषार सिसोदे, माजी नगराध्यक्ष सुरज लोळगे, लक्ष्मण औटे, रेखा कुलकर्णी, मोहिनी सुरज लोळगे, अश्विनी लखमले, बंडू आंधळे, सतीश आहेर, सिद्धार्थ परदेशी, शिवनाथ सोनवणे, कर्ण बावणे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना रावसाहेब दानवे म्हणाले की, सुरज लोळगे यांच्या मागील नगराध्यक्ष पदाच्या काळात त्यांनी दोन कोटी रुपये मागितले, तर मी पाच कोटी दिले. १ हजार १०० घरकुल दिले.
आता पुन्हा भाजप चा नगराध्यक्ष निवडून दिला तर ३ हजार घरकुल देण्यात येईल. सुरज लोळगे यांचा पाच वर्षाचा नगराध्यक्ष पदाचा कार्यकाळ समाधान कारक राहिला आहे. या वेळी पुन्हा भाजपचा नगराध्यक्ष निवडून दिला तर मागेल तितका निधी उपलब्ध करून देण्यात येईल.
कारण राज्यात व केंद्रात भाजपची सत्ता आहे यामुळे निधीची कोणतीही कमतरता भासणार नाही असे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाठ, एकनाथ जाधव, सुरज लोळगे यांचे ही भाषण झाले. यावेळी इच्छुक उमेदवारांनी मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन केले. या कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.















