'रील' वादातील खून प्रकरण आरोपींना सुनावली ५ दिवसांची पोलिस कोठडी

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): सिडको पोलीस ठाण्यापासून अवघ्या १०० फुटांवर तरुण प्रवीण सुरेश मांडोळे (१८, रा. संभाजी कॉलनी, एन-६) याच्यावर चाकूने वार करून करण्यात आलेल्या निघृण खून प्रकरणातील दोन आरोपींना न्यायालयाने ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. सोशल मीडियावरील भाईगिरीच्या 'रील'च्या वादातून आणि वर्चस्ववादातूनच हा खून झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणी पोलिसांनी प्रसन्नजीत हिवाळे आणि अरुण भुल या दोन मुख्य आरोपींना अटक केली आहे. मृत प्रवीण आणि आरोपी प्रसन्नजीत हे पूर्वी
एकाच भागात राहत असल्याने त्यांची मैत्री होती. काही काळापूर्वी त्यांच्यात मुलीच्या कारणावरून वाद झाला होता. हे दोन्ही तरुण इन्स्टाग्रामवर भाईगिरी आणि टपोरीगिरीचे रील बनवायचे. याच सोशल मीडियावरील 'भाईगिरी' च्या वर्चस्ववादातून पाच ते सहा जणांच्या टोळक्याने प्रवीणला बेदम मारहाण करत त्याचा काटा काढला.
दोन पोलीस पथके रवाना
संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, पोलीस बारकाईने तपास करत आहेत. यात आणखी दोन ते तीन आरोपींचा समावेश असून त्यांची नावे निष्पन्न झाली आहेत. फरार आरोपींच्या शोधासाठी पोलिसांचे पथके तयार करण्यात आली असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश गायकवाड यांनी दिली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
https://epaper.sanjwarta.in/
Powered By: Vrudhee Solutions