संभाजीनगर, छत्रपती (सांजवार्ता ब्युरो): रांजणगाव शेणपुंजी फाटा परिसरातील एका औद्योगिक साहित्याच्या दुकानातून ४३ लाख ९ हजार रुपयांचा माल लंपास करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी नाही, तर थेट तक्रारदारानेच छडा लावला आहे. चोरीच्या घटनेला सहा दिवस उलटूनही स्थानिक पोलिसांना आरोपींचा माग काढण्यात अपयश आले होते. अखेर हताश न होता तक्रारदाराने स्वतःच सीसीटीव्ही फुटेजचा कसून तपास करत या मोठ्या चोरीचा उलगडा केला. तक्रारदाराने शोधून काढलेल्या मुख्य संशयिताने गुन्ह्याची कबुली दिली असून, त्याच्या ताब्यातून
चोरीचा काही माल हस्तगत करण्यात आला आहे.
जितेंद्र शांताराम साळुंखे (वय ३१, रा. राजापूर) यांचे रांजणगाव फाटा येथे औद्योगिक साहित्याचे दुकान आहे. ६ ते ७ जूनदरम्यान या दुकानाचे शटर उचकटून चोरांनी साहित्य लंपास केले. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. मात्र आरोपींचा ठावठिकाणा लागत नव्हता. दुकानमालक साळुंखे आणि राजाराम पाटील यांनी स्वतःच सीसीटीव्हीच्या आधारे संशयितांचा शोध सुरू केला. एका संशयितापर्यंत ते पोचले. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने इतर दोन
साथीदारांची नावे आणि चोरीचा मुद्देमाल कुठे लपवून ठेवला याची माहिती दिली. याबाबत त्यांनी वाळूज एमआयडीसी पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांच्या उपस्थितीत आरोपींनी जमिनीत पुरून ठेवलेला चोरीचा माल काढून दिला. त्यानंतर पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले. चोरीसारख्या गुन्ह्यात सहा दिवस आरोपींचा शोध घेण्यात अपयशी ठरलेले डीबी पथक आणि दुसरीकडे सर्वसामान्य नागरिकांनी स्वतः आरोपी शोधून पोलिसांच्या स्वाधीन केल्याची घटना वाळूज महानगरात चर्चेचा विषय ठरली.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions