छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : प्रोझोन मॉलसमोर भरदिवसा धाडसी चोरीची खळबळजनक घटना समोर आली आहे. चोरट्यांनी एका वन अधिकाऱ्याच्या गाडीची काच फोडून आत असलेली शासकीय सर्व्हिस पिस्तूल (९ एमएम), १५ जिवंत काडतुसे आणि शासकीय गणवेश असलेली सुटकेस पळवून नेली. ही घटना मंगळवारी (७ जुलै) सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात अज्ञात चोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस चोरांचा कसून शोध घेत आहेत.
फिर्यादी चंद्रकांत गोपाळराव पोतुलवार (४२, रा. काठेवाडी, देगलूर) हे बोधडी येथे वन परिक्षेत्र अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. ते मंगळवारी कारने (एमएच-२४-एटी-६८१७) हायकोर्टात सुनावणीसाठी शहरात आले होते. हायकोर्टाचे काम आटोपून सायंकाळी ४:४० वाजेच्या सुमारास ते व त्यांचे मामा रवींद्र सूर्यकांतराव पेरगुलवार यांच्यासोबत प्रोझोन मॉल येथे गेले होते. चालक विठ्ठल दुधकवडे (रा. मंगनाळी, कंधार) याने मॉलच्या गेटवर अधिकाऱ्यांना सोडले आणि गाडी मॉलच्या समोर पार्क केली. सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास चालक लघुशंकेसाठी मॉलमध्ये गेला.
तो परत आल्यावर त्याला गाडीच्या डाव्या बाजूची मागील काच फोडलेली दिसली. त्याने तात्काळ अधिकाऱ्याला याची माहिती दिली.
नेम प्लेट असलेला गणवेशही लंपास
पोतुलवार यांनी गाडीजवळ पाहणी केली असता गाडीतील त्यांची लॉक केलेली सुटकेस गायब असल्याचे निदर्शनास आले. या सुटकेसमध्ये त्यांचे ९ एमएम शासकीय सर्व्हिस पिस्तूल, १५ जिवंत काडतुसे, महाराष्ट्र वन सेवा असा बॅच आणि तीन स्टार असलेला शासकीय गणवेश (नेमप्लेटसह), लाल बेल्ट आणि इतर काही साधे कपडे असा संवेदनशील आणि महत्त्वाचा मुद्देमाल होता.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions