बाबा फर्जनच्या बंगल्यावर छापा : साडेपाच कोटी जप्त

Foto
जिवंत काडतुसासह मोठा शस्त्रसाठा : सोने-चांदीसह विदेशी मद्यही आढळले
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): १९८० ते १९९० च्या दशकात शहरातील कामगार चळवळी आणि गुन्हेगारी जगतात आपला दबदबा निर्माण करणारा माजी डॉन बाबा फर्जन याच्यावर गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. मिटमिटा येथील त्याच्या आलिशान बंगल्यावर पोलिसांनी टाकलेल्या धाडसी छाप्यात तब्बल साडेपाच कोटी रुपयांची रोकड, सोन्या-चांदीचे दागिने, बेकायदेशीर व परवानाधारक अग्निशस्त्रे, शेकडो जिवंत काडतुसे आणि विदेशी मद्याचा मोठा साठा हस्तगत करण्यात आला आहे. या कारवाईमुळे शहराच्या राजकीय आणि गुन्हेगारी वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली असून, विस्मृतीत गेलेला बाबा फर्जन पुन्हा एकदा अचानक चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.
शुक्रवारी (दि.१०) दुपारी साडेचार वाजता या बंगल्यावर फौजफाट्यासह छापा टाकला. बंगल्यामध्ये शीलाबाई बाबा फर्जन दोरडी ऊर्फ शीलाबाई गणपत साळवे (४८) या राहतात. पोलिसांनी घेतलेल्या झडतीमध्ये दोन खोल्या कुलूपबंद आढळून आल्या. पोलिसांनी या खोल्यांचे कुलूप तोडून आत प्रवेश केला असता, खोल्यांमध्ये एक रिव्हॉल्व्हर, दोन पिस्तुल, चार रायफल, चार मॅगझिन आणि
१२ बोअर बंदकीची ६३५० जिवंत काडतुसे, तलवारी, गुप्ती, भाले, फरशी, कोयते, मिलिटरी जॅक नाईफ आणि विविध आकारांचे व प्रकारचे २० हून अधिक धारदार चाकू मिळून आले. तसेच ३४ हजार ८३६ रुपयांच्या विदेशी मद्याच्या बाटल्या, सीपी प्लस कंपनीचे डीव्हीआर मशीन आणि शस्त्र परवान्यांच्या प्रतीही आढळून आल्या.
दहाच्या नोटांचेही बंडल
कपाट, धान्याच्या अनेक लोखंडी कोठ्या, काही सुटकेस आढळून आल्या. त्या दोऱ्यांनी बांधून ठेवल्याचेही दिसून आले. पोलिसांनी तपासणी केली असता जुन्या १०, २०, ५०, १००, २००, १००० रुपयांच्या नोटांची बंडले आढळून आली. रोकड मोजण्यासाठी दोन मशीन आणाव्या लागल्या.
भेट
एकूण जप्त मुद्देमाल ५,६५,५४,४३४
▶ रोख रक्कम ५,२६,२९,५६०, सोन्याचे दागिने, १५१.३३ ग्रॅम, चांदीचे दागिने, ३,९२१.२४ ग्रॅम, अग्निशस्त्रे, १ रिव्हॉल्व्हर, २ पिस्टल, ४ रायफल, ४ मॅगझिन, ६३२ जिवंत काडतुसे, तलवारी, गुप्ती, भाले, फरशी, कोयते, मिलिटरी जॅक नाईफ आणि २० हून अधिक चाकू.
२६ तास रोकडची मोजणी
▶ तब्बल २६ तास या रोकडची मोजणी करावी लागली. त्यानंतर ही रोकड ५ कोटी २६ लाख २९ हजार ५६० रुपये असल्याचे समोर आले. तसेच २१ लाख ३४ हजार ३५० रुपयांचे १५१.३३ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि ८ लाख ९ हजार २४८ रुपयांचे ३,९२१.२४ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने व शिक्के हस्तगत करण्यात आले. एकूण ५ कोटी ६५ लाख ५४ हजार ४३४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी गुन्हे शाखेचे हवालदार योगेश नवसारे यांच्या तक्रारीवरून शीलाबाई बाबा फर्जन दोरडी हिच्याविरुद्ध छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
एटीएस, मिल्ट्री इंटेलिजन्सची
शहरातील एका घरामध्ये मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आणि जिवंत काडतुसे आढळून आल्याने दहशतवादविरोधी पथक (एटीएस)
आणि मिल्ट्रीची इंटेलिजन्स शाखाही दाखल झाले. त्यांनी मिटमिटा भागातील बाबा फर्जनच्या बंगल्याला भेट दिली. घरात सापडलेली शस्त्रे
नेमकी आली कोठून आणि त्याचा वापर कशासाठी करण्यात येत होता किंवा केला जाणार होता, याचा तपास करण्यात येत आहे.
https:/epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions