छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : पोलिसात तक्रार दिल्याच्या रागातून एका रिक्षाचालकावर भरदिवसा तलवारीने हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना सोमवारी (दि. १ जून) सकाळी सव्वानऊच्या सुमारास सूतगिरणी चौकात घडली. भररस्त्यात तलवार उगारून दहशत माजवणाऱ्या या घटनेमुळे सूतगिरणी परिसरात मोठी खळबळ उडाली असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
या प्रकरणी परमेश्वर एकनाथ चव्हाण (३६), ज्ञानेश्वर एकनाथ चव्हाण (४०) आणि विजय दत्तात्रय लहुगडे (२५, सर्व रा. सूतगिरणी परिसर) अशा तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक सचिन कुंभार यांनी दिली. फिर्यादी शुभम
चतुर्भुज ऊर्फ सतीश जगरवाल (२१, रा. भारतनगर) हा त्याचा मित्र समीर नसीर शेख याच्यासह रिक्षात प्रवासी घेऊन सूतगिरणी चौकात आला असता, स्कूटीवरून आलेल्या तिन्ही आरोपींनी त्यांना गाठले. तू पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात माझ्याविरुद्ध तक्रार का दिलीस? अशी कुरापत काढून त्यांनी शुभम आणि समीरला लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. याच दरम्यान परमेश्वर चव्हाण याने थेट तलवार काढून हवेत फिरवत जिवे मारण्याची धमकी दिली. यामुळे चौकात एकच पळापळ झाली. सुदैवाने उपस्थित नागरिकांनी मध्यस्थी केल्याने पुढील अनर्थ टळला. त्यानंतर फिर्यादीने धाडस दाखवून आरोपीच्या हातातील तलवार हिसकावून घेत थेट पोलीस ठाणे गाठले.
मी पोलीस आहे म्हणत केली होती दमदाटी
वादाची ठिणगी सोमवारी पहाटे ४ वाजता सेव्हनहिल उड्डाणपुलाजवळील रसवंती गृहावर पडली होती. आरोपी परमेश्वर चव्हाण याने शुभम आणि समीर यांना मी पोलीस आहे असे सांगून ओळखपत्र व रिक्षाच्या कागदपत्रांची मागणी करत विनाकारण शिवीगाळ केली होती. त्यावेळी हा वाद पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात मिटवण्यात आला होता; मात्र त्याचाच राग मनात धरून सकाळी हा जीवघेणा हल्ला करण्यात आला. याप्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.











