छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) मिक्स सॉल्वेन्ट केमिकलचा पुरवठा करण्याच्या बहाण्याने वाळूज येथील एका उद्योजकाकडून सव्वासात लाख रुपयांची अॅडव्हान्स रक्कम घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी मुंबईच्या धीरज पेट्रोकेमिकल अँड गॅस फर्मचे संचालक धीरज पांडे, संतोष पांडे आणि भावेश पटेल (सर्व रा. मुंबई) यांच्या विरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, शिवप्रसाद अग्रवाल (रा. वाळूज) यांची वाळूज एमआयडीसीतील जी-४२ मध्ये गिता केमिकल्स नावाची कंपनी आहे. २०२० मध्ये भावेश पटेल (रा. मुंबई) अग्रवाल यांच्या कंपनीत कच्चे केमिकल खरेदीसाठी आले होते. यावेळी पटेल यांनी त्यांचे मित्र धिरज पांडे यांच्याकडुन मिक्स
सॉल्वेन्ट केमिकल खरेदी करून देऊ शकतो यासाठी मला किलोमागे १ रुपयाप्रमाणे कमिशन द्यावे लागेल, असे सांगून त्यांनी अग्रवाल यांचा विश्वास संपादन केला होता.
प्रतिकिलो ६१ रुपये २० पैसे प्रमाणे १० हजार लिटर मिक्स सॉल्वेन्ट खरेदी करण्यासाठी ७ डिसेंबर २०२० रोजी अग्रवाल यांनी आगाऊ रक्कम म्हणून ६ लाख १२ हजार तसेच जीएसटीचे १ लाख १० हजार १६० असे एकूण ७ लाख २२ हजार १६० रुपये आरटीजीएसद्वारे धीरज पेट्रोकेमिकल यांच्या बँक खात्यावर पाठविले होते. मात्र वेळोवेळी फोन करून ही अग्रवाल यांना केमिकल मिळाले नाही. यामुळे जुलै २०२१ मध्ये त्यांनी मीरा भाईंदर येथील भावेश पटेल यांच्या कार्यालयात जाऊन केमिकल बाबत विचारणा केली. तसेच धीरज व संतोष पांडे यांच्या मोबाईलवर संपर्क केला तेव्हा त्यांना उडवाउडवीची उत्तर देण्यात आली.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions











