छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : खेळता खेळता बदाम, शेंगदाणा आणि चिंचोका गिळल्यामुळे श्वास गुदमरलेल्या तीन चिमुकल्यांना घाटी रुग्णालयातील डॉक्टरांनी यशस्वी शस्त्रक्रियेद्वारे नवे जीवन दिले आहे. घाटीच्या कान, नाक आणि घसा विभागातील तज्ज्ञ डॉक्टरांनी अवघ्या तीन दिवसांत या तीन गुंतागुंतीच्या ब्रॉन्कोस्कोपी शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडल्या. डॉक्टरांच्या या तत्परतेमुळे तीनही बालकांचे प्राण वाचले आहेत.
शहरातील दोन वर्षांच्या मुलाने खेळताना बदाम गिळला होता. खोकला आणि दम लागत असल्याने आवाज बदलला होता. कुटुंबीयांनी तात्काळ घाटी रुग्णालयात केल्यानंतर बालरोग विभागप्रमुख डॉ. प्रभा खैरे-मोरे यांनी तपासणी करून ईएनटी विभागाकडे पेशंट वर्ग केले. कान, नाक, घसा विभागप्रमुख डॉ. सुनील देशमुख यांनी तातडीने
ब्रॉन्कोस्कोपी शस्त्रक्रियाद्वारे गिळलेला ब्रदाम अलगद बाहेर काढला. दुसऱ्या केसमध्ये लहान मुलीने शेंगदाणा गिळला. तिच्या फुफ्फुसात शेंगदाणा अडकल्याने त्रास झाल्याने कुटुंबीयांनी तिला घाटी रुग्णालयात दाखल केले.
तसेच ८ वर्षीय मुलाने चिंचोका गिळाल्याने श्वास घेण्यास त्रास झाला होता. या लहानग्यावर घाटी रुग्णालयात तातडीने शस्त्रक्रियासह करण्यात आली. कुटुंबीयांनी घाटी प्रशासन व डॉक्टरांचे आभार मानले. अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांच्या मार्गदर्शनाखाली बालरोग विभागप्रमुख प्रभा खैरे-मोरे, ईएनटी विभागप्रमुख सुनील देशमुख, डॉ. सोनाली जटाळे, डॉ. ओजस कुलकर्णी, डॉ. उत्कर्ष शहा, डॉ. ओम प्रकाश, ओटी इन्चार्ज अश्विनी झेंडे, राहिला शेख, भुलतज्ज्ञ डॉ. विद्या चव्हाण आदींनी परिश्रम घेतले.
https://epaper.sanjwarta. Powered By: Vrudhee Solutions











