सोयाबीन खरेदीप्रकरणी लेखापालास जामीन १ कोटीपेक्षा जास्त रकमेच्या फसवणुकीचा आरोप

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): लातूर येथील मांजरा सीड्स कंपनीचे लेखापाल निवृत्ती लक्ष्मण आलापुरे यांना सोयाबीन खरेदी व शेतकरी देयक प्रकरणात अटक झाली होती. त्यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने जामीन मंजूर केला आहे.
न्यायमूर्ती सिद्धेश्वर ठोंबरे यांनी हा आदेश दिला. फिर्यादीसह इतर शेतकऱ्यांनी मांजरा सीड्स कंपनीकडे सोयाबीन जमा केले होते. मात्र, मालाची विक्री करूनही कंपनीकडून देय रक्कम अदा करण्यात आली नसल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणात अंतिम अहवालानुसार एक कोटी ३१ लाखापेक्षा जास्त रकमेची फसवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात एमआयडीसी लातूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
करण्यात आला होता. त्यांनी जामिनासाठी खंडपीठात धाव घेतली. आरोपीतर्फे अॅड. गजानन कदम यांनी न्यायालयात युक्तिवाद केला. अर्जदार केवळ कंपनीत लेखापाल आहेत. कंपनीच्या आर्थिक धोरणात्मक निर्णयांशी त्यांचा संबंध नव्हता, असे त्यांनी न्यायालायच्या निदर्शनास आणून दिले. न्यायालयाने सांगितले की, तपासातील उपलब्ध सामग्रीनुसार अर्जदार मुनीम होता आणि त्याची भूमिका प्रामुख्याने पावत्या देण्यापुरती दिसून येते. त्यामुळे खंडपीठाने अर्जदाराचा जामीन मंजूर केला. सरकारतर्फे अॅड. एस. व्ही. हंगे यांनी काम पाहिले.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions